
जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी रविवारी हिंदुस्थानचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून पदभार स्वीकारला असून तिन्ही दलांमधील समन्वय वाढवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल.
जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी देशाचे सर्वोच्च लष्करी कमांडर म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर निरोप घेतला.
पाकिस्तान आणि चीन संदर्भातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ लाभलेल्या आपल्या कारकिर्दीत, जनरल सुब्रमणी यांनी विविध प्रकारच्या संघर्षमय भागांत आणि वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितींमध्ये सेवा बजावली असून त्यांनी अनेक कमांड, स्टाफ आणि इन्स्ट्रक्शनल पदे भूषवली आहेत. त्यांनी १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत वाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम पाहिले आणि मार्च २०२३ ते जून २०२४ पर्यंत ते सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल सुब्रमणी यांचे मुख्य काम इंटिग्रेटेड मिलिटरी कमांड्स सुरू करून थिएटरायझेशन मॉडेलची अंमलबजावणी करणे हे असेल.

























































