व्यापाऱ्यांनी अँटीजन टेस्ट न केल्याने गेवराईत 10 दुकानाना ठोकले सील

गेवराई शहरात आज आठवडा बाजारात कोरोनाच्या गांभिर्य नसणाऱ्या दुकानदारांवर तहसिलदार सचिन खाडे यांच्या निर्देशांनुसार कारवाई करण्यात आली. बाजारात झालेली गर्दी पाहून तहसिलदार स्वत: रस्त्यावर उतरले आणि दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. यावेळी जवळपास 10 दुकाने सील करण्यात आली, तर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत 8800 रुपयांचा दंडही वसूल केला. तहसिलदार स्वत: रस्त्यावर उतरल्याने अँटीजन टेस्ट न केलेल्या अनेक दुकानदारांनी दुकाने झटपट बंद केली.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गेवराई शहरातही प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या असून नियन न पाळणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. आज शहरात आठवडी बाजारात मोठी गर्दी झाल्याचे निदर्शनास आल्यावर तहसिलदार खाडे यांनी दंडात्मक कारवाई केली. या दरम्यान 10 दुकानदारांनी अँटीजन टेस्ट न केल्याचे आढळले. या दुकानदारांच्या दुकानांना सील लावण्यात आले, तर विनामास्क फिरणाऱ्या 44 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्याधीकारी उमेश ढाकणे, मंडळ अधीकारी प्रकाश तांबे, तलाठी पाढंरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे .

दरम्यान, तहसिलदार खाडे यांनी मास्क लावण्याची तसेच व्यापारी वर्गाने कोरोनाची चाचणी करावी नंतरच आपले व्यावसाय सुरू ठेवावेत असे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या