घारगाव पोस्ट ऑफिसमधील तिजोरी चोरटय़ांनी पळविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील घारगाव येथील पोस्ट ऑफिस फोडून चोरटय़ांनी तिजोरीच चोरून नेल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली, तर पठारावरील नांदूर खंदरमाळ परिसरातही चोरटय़ांनी घरे फोडली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घारगाव येथे डाक कार्यालय आहे. आतमध्ये सिमेंट व दगडी बांधकामात केलेली लोखंडी तिजोरी आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी पोस्ट ऑफिसचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी तिजोरी चोरून नेली आहे. सकाळी काही नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी याबाबत पोस्टमन किशोर पोळ यांना माहिती दिली.

चोरीची घटना समजताच, वरिष्ठ सहायक अधीक्षक संतोष जोशी, सबपोस्ट मास्तर सुमंत काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घारगाव ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, नांदूर खंदरमाळ येथेही चोरटय़ांनी धुमाकूळ घालत काही घरे फोडली आहेत. याहा घरांमधून मोठय़ा प्रमाणात ऐवज गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.