
‘कोन हा?’
गच्चीवर उताणे झोपलेल्या चौघांपैकी एकाच्या छातीवर धप धप ठोके पडले त्याने काळोखातच डोक वर उचलून पाहिलं.
हळदीत मनसोक्त नाचल्यावर त्या चौघांनी घराच्या गच्चीवर ताणून दिली. खाली मांडवात शुकशुकाट पसरला होता.
‘धप धप’… परत रांगेतल्या तिसऱ्याच्या बाबतीत असेच विचित्र घडले. ‘फटकी इली तुज्या तोंडार ती…कोन हा?’
‘गप झोपा रे, कोन नाय!’ चौथा वैतागून म्हणाला.
काळोखात माडाच्या झावळ्या शांत, पण विचित्र हलत होत्या.
‘मेल्यानूं भूत हा ता!’ त्याने घाबरून डोळ्यांवर शर्ट ओढून घेतला.
‘नक्कीच हडळ आसात…बापयांच्याच पाटी लागता ती!’ घट्ट डोळे मिटूनच चौघांचा संवाद सुरू होता…
डुलकी लागते न लागते तोच पुन्हा ‘धप धप’
डोळे उघडून बघितल्यावर समोर काहीच नाही.
‘कोन हा रे? हिंमत आसात त् ये फुढे!’ एकजण शिवी हासडत म्हणाला.
थोडा वेळ वाट पाहिल्यावर त्याला एक मांजर पळताना दिसलं.
ते मांजर त्यांच्या छातीवरून विजेच्या वेगाने पळून तिथून गायब व्हायचं.
‘कोन नाय…मांजरांचा झोंबाड हा ता!’ असे लक्षात येताच त्यांच्यात हशा पिकला.
काहीकाळ निर्माण झालेले भीतीचे वातावरण मग हलकेफुलके झाले.
त्यांनी बघायचे धाडस केले म्हणून, नाहीतर गावभर पसरले असते…‘ह्या गच्चीवर भूत हा!’
आणि पुन्हा तिथेच काय, गावात इतरही कुणाच्या गच्चीवर रात्री झोपायला जायची कुणाची हिंमत झाली नसती.






























































