चुनाभट्टीत मद्यधुंद चालकाने तरुणीला फरफटत नेले, तिघांना अटक

2126

दारू ढोसल्यानंतर सुसाट कार चालवत मद्यधुंद चालकाने 19 वर्षीय तरुणीला धडक देऊन तिला फरफटत नेल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सायंकाळी चुनाभट्टी येथे घडली. दारूची पार्टी केल्यानंतर तिघे मित्र कारमधून निघाले पण नशेत तर्र असलेल्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्यावरील अन्य गाड्यांना धडक देत अर्चना पारठे (19) हिला उडवले. गंभीर जखमी झालेल्या अर्चनाचा त्यात नाहक जीव गेला.

चुनाभट्टीतील ताडवाडी परिसरात आईवडील, दोन बहिणी आणि भावासोबत राहणार्‍या अर्चनाची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर ती घरातच होती. सायंकाळी परिसरात एक फेरफटका मारला म्हणजे थोडे बरे वाटेल म्हणून ती दोघी मैत्रिणींसोबत घराबाहेर पडली. मार्केट परिसरातून रस्त्याच्या कडेने चालत ती घराकडे येत असताना साडेआठच्या सुमारास अचानक मागून सुसाट आलेल्या कारने तिला धडक दिली. नुसती धडक नाही तर कारने तिला फरफटत नेले. या अपघातामुळे परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली. काही जण गंभीर जखमी अर्चनाला उचलून रुग्णालयाच्या दिशेने घेऊन गेले तर काहींनी कारमधील दारूच्या नशेत असलेल्या तिघा तरुणांना मारहाण करीत चुनाभट्टी पोलिसांच्या ताब्यात दिले. दुर्दैवाने रुग्णालयात जाईपर्यंत अर्चनाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. शेकडोच्या जमावाने पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चा नेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान चुनाभट्टी पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून कारचालक धीरज कदम (28), कारचा मालक मृणाल गमरे (32) आणि त्यांचा मित्र अक्षय महांगरे (28) या तिघांना अटक केली.

नशेतली मस्ती नडली

धीरज, मृणाल आणि अक्षय हे तिघे त्याच परिसरात कारमध्येच दारू ढोसत बसले होते. दारू पिऊन तर्राट झाल्यानंतर धीरजने गाडीचा ताबा घेतला आणि कार वेगात चालवायचा सुरुवात केली. काही अंतरावर गेल्यानंतर धीरजचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका गाडीला धडक दिली. त्यानंतर मैत्रिणीसोबत चालणार्‍या अर्चनाला उडवून कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. दारूच्या नशेत गाडी चालविण्याची तरुणांची मस्ती अर्चनाच्या मात्र जीवावर बेतली.

परिसरात संताप आणि हळहळ

अर्चनाच्या अशा अपघाती मृत्यूनंतर चुनाभट्टीतील नागरिकांमध्ये  संतापाचे वातावरण पसरले. एकीकडे रोष व्यक्त होत असताना अर्चनाचे शेजारी, नातेवाईक तसेच मित्रपरिवारांमधून हळहळ व्यक्त होत होती. चुनाभट्टी पोलिसांनी वेळीच कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकल्याने परिसरातील वातावरण शांत झाले. आज सायंकाळी अर्चनावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या