
सामना प्रतिनिधी । धाराशीव
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे सात हजार कोटी रुपयांची मदत मागण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अवनी वाघिणीच्या प्रकरणात नाही चुकीचे घडले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी उपाययोजनांची माहिती देत असताना पशुधनाची विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हय़ात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असून रोहयोतून रोजगार देण्यात येणार आहेत. मराठवाडय़ासाठी वरदाई ठरणाऱया कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी 2200 कोटी रुपयांचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते तसेच लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
राज्यातील आणखी 350 गावांमध्ये दुष्काळ जाहीर
राज्यातील 26 जिह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या मागणीनुसार 250 महसुली मंडळांत म्हणजे पाच हजार गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणखी 18 म्हणजे एकूण 268 महसुली मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला. या 18 महसुली मंडळांत सुमारे 350 गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील 151 तालुक्यांव्यतिरिक्त ज्या गावांमध्ये सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे अशा 268 महसुली मंडळांची घोषणा आज करण्यात आली. या गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात माफी यासारख्या सवलती तत्काळ लागू करण्यात आल्या आहेत.































































