पुढील पाच वर्षे पृथ्वीसाठी धोक्याची! वाढत्या तापमानावरून संयुक्त राष्ट्रांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांच्या एका ताज्या अहवालाने जागतिक तापमानवाढीबाबत संपूर्ण जगाला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. या अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान अत्यंत वेगाने वाढणार असून, ते 1.5 अंश सेल्सिअसचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून उष्णतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढण्याची भीती आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) स्पष्ट केले आहे की, मानवनिर्मित प्रदूषणामुळे येत्या काळात हवामान अधिकच भीषण रूप धारण करेल.

पॅरिस हवामान करारानुसार, औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत पृथ्वीचे सरासरी तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, डब्ल्यूएमओच्या नवीन अहवालानुसार, 2026 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत सरासरी तापमान 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याची 75 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाच वर्षांपैकी किमान एका वर्षात तापमानाची ही धोक्याची पातळी ओलांडली जाण्याची शक्यता तब्बल 91 टक्के आहे तर, याच कालावधीत 2024 सालचा उष्णतेचा विक्रम मोडला जाण्याची 86 टक्के शक्यता आहे. म्हणजेच, आगामी वर्षे मानवजातीसाठी अधिक उष्ण आणि आव्हानात्मक असणार आहेत.

या अहवालातील सर्वात चिंताजनक बाब आर्क्टिक प्रदेशाबाबत समोर आली आहे. या भागात जगाच्या इतर भागांच्या तुलनेत सुमारे साडेतीन पट वेगाने तापमान वाढत आहे. 2026 ते 2030 दरम्यान आर्क्टिकचे तापमान सरासरी 1.66 अंश सेल्सिअसने वाढू शकते, ज्यामुळे समुद्रावरील बर्फ वेगाने वितळत आहे. बर्फ कमी झाल्यामुळे समुद्राकडून अधिक सूर्यप्रकाश शोषला जात आहे आणि पर्यायाने तापमान आणखी वाढत आहे. तापमानातील या वाढीमुळे पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळे यांसारख्या टोकाच्या हवामान घटना वारंवार घडत आहेत. सध्या युरोपसह हिंदुस्थान, पाकिस्तान आणि इतर आशियाई देशांमध्ये उष्णतेच्या लाटा तीव्र झाल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, तापमानात होणारी प्रत्येक 0.1 अंश सेल्सिअसची वाढ विनाशकारी ठरू शकते, ज्यामुळे प्रवाळ बेटे, हिमनद्या आणि अनेक नैसर्गिक परिसंस्था कायमच्या नष्ट होण्याचा धोका आहे. उष्णतेच्या या लाटांचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थानचा समावेश आहे. आगामी काळात हिंदुस्थानात रात्रीचे तापमानही चढेच राहणार असल्याने नागरिकांच्या विश्रांतीमध्ये अडथळा निर्माण होईल. याचा थेट परिणाम शेती, आरोग्य आणि पाण्याच्या उपलब्धतेवर होणार आहे. शहरांमधील ‘अर्बन हीट आयलंड’च्या प्रभावामुळे शहरी भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. यासाठी हिंदुस्थानला आपली ‘उष्णता कृती योजना’ (Heat Action Plan) अधिक मजबूत करण्याची गरज आहे.

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी सध्या केले जात असलेले प्रयत्न अपुरे असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे हवामान प्रमुख सायमन स्टील यांनी व्यक्त केले आहे. शास्त्रज्ञांनी अद्यापही आशा सोडलेली नाही. आपण आताच कार्बन उत्सर्जन तातडीने कमी केले, जंगलांच्या संरक्षणासाठी ठोस धोरणे राबवली तर, होणारे नुकसान मर्यादित राखता येईल. लहान पावले उचलणेही आता महत्त्वाचे बनले असून पुढील पाच वर्षे पृथ्वीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.