
सामना प्रतिनिधी । पणजी
गोवा माईल्स व इतर अॅप आधारित टॅक्सीसेवेस विरोधासाठी राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी अचानक संप सुरू केलेला आहे. राज्य सरकार अॅप आधारित टॅक्सीसेवाच सुरू ठेवण्यावर ठाम आहे. टॅक्सी व्यावसायिकांनी स्वतंत्र अॅप तयार करा नाहीतर गोवा माईल्स या अॅप आधारित टॅक्सी सेवेमध्ये सहभागी व्हा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.
स्थानिक टॅक्सी मालक-चालकांचे हित कोणत्याही स्थितीत जपले जाईल, अशी ग्वाहीही सरकारने दिलेली असली तरी अचानक आंदोलन करण्याचा निर्णय टॅक्सी व्यावसायिकांनी घेतला आहे. गोव्याचा टॅक्सी व्यवसायिक मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर सरकारने गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे गोवा माइल्स ही अॅप आधारीत टॅक्सी सेवा सुरु केली आहे. या सेवेस टॅक्सी व्यावसायिकांचा विरोध असून हे अॅप बंद करावे,अशी टॅक्सी व्यावसायिकांची मागणी आहे.
सोशल मीडिया मधून देखील गोव्यातील टॅक्सी व्यवसायावर टिकेची झोड उठवली जाते. यापूर्वी टॅक्सी व्यावसायिकांनी डिजिटल मीटर लावावे यासाठी सरकारने प्रयत्न केला होता. मात्र टॅक्सीवाल्यांनी त्यास रस्त्यावर उतरून विरोध केला. आताही ते हेच करत आहेत, त्यांचा विरोध मोडून काढण्याचा निर्धार सरकारने विधानसभा अधिवेशनात बोलून दाखवला आहे. टॅक्सी व्यावसायिकांनी अचानक पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी विमानतळ, रेल्वे स्टेशनवर कदंब महामंडळातर्फे अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.





























































