10 महिन्यात 66 कोटींच्या सोन्याची तस्करी, 23 वर्षांच्या सराफाला मुंबईतून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gold

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने 23 वर्षांच्या सराफाला अटक केली आहे. साहील जैन असं त्याचं नाव असून त्याने फक्त 10 महिन्यात 180 किलो सोन्याची तस्करी केली आहे. या सोन्याची किंमत सध्याच्या घडीला 66 कोटी इतकी आहे. सोन्याची तस्करी ही नवीन बाब नसली तरी ज्या प्रमाणामध्ये सोनं तस्करी करून मुंबईमध्ये आणलं जातं आहे त्याचे प्रमाण हे धक्कादायक आहे.

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या मुंबई विभागाला त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी कोलकात्याहून मुंबईला हावडा एक्सप्रेसने आलेल्या गोपा रामा या व्यक्तीला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 6.9 किलोंचे सोने सापडले. चौकशीमध्ये कळाले की हे सोने साहील जैन याला देण्यासाठी गोपा मुंबईत आला होता. जाकिटाच्या आतल्या भागात हे सोने लपवून आणण्यात येत होते.

मौल्यवान दागिने, सोने यांच्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आले आहे. ज्यामुळे तस्करीचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी हे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढले की एक सराफ 18 महिन्यात 180 किलो सोन्याची तस्करी करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. यामुळे महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने अशा प्रकारे होणाऱ्या सोने तस्करीवर बारीक नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे.

अटक केलेल्या गोपा रामा याने सांगितले की जे सोनं त्याने साहील जैन याला देण्यासाठी आणलं होतं ते त्याने बांग्लादेशमधून आणलं होतं. बांग्लादेशमधून मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचं महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला कळाले आहे. हिंदुस्थान आणि बांग्लादेशच्या सीमेवर अनेक ठिकाणी घुसखोरी आजही होत असून याच पद्धतीने हिंदुस्थान-म्यानमार सीमेवरूनही घुसखोरी होत असल्याचं संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नोटाबंदीनंतर बनावट नोटा तयार करण्याच्या उद्योगाला मोठा हादरा बसला आहे. पूर्वी ज्या मार्गाने नकली नोटा हिंदुस्थानात आणल्या जात होत्या, त्याच मार्गाने आता सोन्याची तस्करी व्हायला लागल्याचे संचलनालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. जे सोनं गोपा रामा याच्याकडून हस्तगत करण्यात आलं आहे, ते विदेशी बनावटीचं सोनं आहे मात्र त्याच्यावर कोणतीही खूण नाहीये. साहील जैन हा तस्करीच्या या धंद्यात एकटा आहे का त्याच्याशिवाय आणखीही काही माणसं यामध्ये सहभागी आहे हे शोधण्याचा तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत. गोपा राम आणि साहील जैन यांना दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा न्यायालयाने आदेश दिला असून या दोघांकडून काही महत्वाची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. चौकशीदरम्यान हे दोघे आणखी काही जणांची नावे आणि तस्करी कशी चालते याबद्दल माहिती देण्याची शक्यता आहे.