खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरणारा उच्चशिक्षित चोरटा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्समधील दुकानदाराची नजर चुकवून 12 तोळ्यांचे दागिने चोरून नेणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 10 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विनय प्रकाश पावटेकर (वय 39, रा. संभाजीनगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना 12 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील लक्ष्मी गोल्ड ओर्नामेंटमध्ये घडली होती.

रविवार पेठेतील लक्ष्मी गोल्ड ओर्नामेंटमध्यून दागिन्यांची चोरी करणारा शनिवार पेठेतील एका मंदीराजवळ येणार असल्याची माहिती पोलीस नाईक सागर केकाण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विनय पावटेकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले दागिने वितळवून त्याने सोन्याची लगड बनविली होती. पोलिसांनी 10 तोळ्याची सोन्याची लगड जप्त केली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, अजिज बेग, फहिम सैय्यद, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, अमेय रसाळ, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, बंटी कांबळे, विशाल जाधव, राहूल मोरे, रवी लोखंडे यांच्या पथकाने केली.