
संजय गांधी निराधार योजनेतून निवृत्ती वेतन सुरू करतो, अशी बतावणी करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निकटवर्तीयांनी 82 वर्षीय वृद्धेला लाखोंचा गंडा घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामध्ये खोट्या दस्तांवर वृद्धेचा अंगठा घेऊन तब्बल 17 एकर जमीन हडपण्यात आली आहे. यामुळे राज्यात गृहखात्याच्या अकार्यक्षमतेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यातील या गरीब निराधार वृद्धेला आपली जमीन विकायची नव्हती. मात्र गोपीचंद पडळकर यांचा भाऊ आणि फार्म हाऊसचा मॅनेजर यांनी वृद्धेला अक्षरशः उचलून आटपाटी कार्यालयात नेले. या ठिकाणी वृद्धेला कोणतीही सूचना न देता मनमानीपणे दस्तांवर अंगठे लावण्यास भाग पाडले. या जमिनीच्या बदल्यात 1500 रुपये खायला आणि पेन्शन सुरू करून देतो असे लुटारूंनी भासवले. मात्र वृद्धेची फसवणूक करून पैसेच दिले नाहीत. लुटारूंकडून मात्र पैसे दिल्याचा दावा केला जात आहे.
कुणीही दाद घेईना, म्हणून आझाद मैदानात
आपल्या जमिनीचे पैसे मिळाले नसल्याचे या वृद्धेकडून सांगितले जात आहे. या फसवणुकीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांकडे वारंवार खेटे मारूनही कोणताही न्याय मिळाला नाही. म्हणूनच 3 जुलैपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू असल्याचे अन्यायग्रस्त वृद्धेकडून सांगण्यात आले. यासाङ्गी आपण न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
तक्रार करू नये म्हणून धमक्या
विठाबाई या पडळकरांच्या भावकीमधल्याच आहेत. मात्र आमदार असलेल्या पडळकरांनी विठाबाईंना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अन्यायाविरोधात तक्रार करू नये यासाठी वृद्धेला धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने आंदोलनाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी विठाबाई यांनी केली आहे.