अवयव विक्रीसाठी शेतकरी आज नागपुरात, विधिमंडळासमोर आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेचे कर्ज फेडण्यासाठी आपले अवयव विक्रीला काढणारे शेतकरी मंगळवार 19 डिसेंबर रोजी नागपुरात विधिमंडळासमोर आंदोलन करणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील 10 शेतकऱयांनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी मागील काही दिवसांपासून स्वत:चे अवयव विक्रीला काढले आहेत. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही काहीच उपयोग न झाल्याने हे सर्व शेतकरी मुंबईला धडकले होते. पोलिसांनी उफराटा न्याय लावत या शेतकऱ्यांनाच अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गोरेगाव येथे परतल्यानंतर या शेतकऱ्यांनी येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तरीही राज्य सरकारने दखल न घेतल्याने या शेतकऱ्यांनी आता नागपुरात विधिमंडळासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी सोमवारी दीपक कावरखे, नामदेव पतंगे, धीरज मापारी, गजानन कावरखे, दशरथ मुळे, विजय कावरखे, रामेश्वर कावरखे, अशोक कावरखे, गजानन जाधक आदी शेतकरी नागपूरकडे रवाना झाले.