महाविकास आघाडीच्या जिल्हा नियोजनात मंजूर कामांना नव्या सरकारची स्थगिती! जिल्हय़ाजिल्हय़ातील कामे रखडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकट ओसरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्यातील विकासकामे वेगाने सुरू केली होती. जिल्हा नियोजन समित्यांनाही निधी देऊन जिह्याजिह्यातील, गावागावांतील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा नियोजन बैठकांत 1 एप्रिलपासून मंजूर करण्यात आलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. यामुळे ऐन पावसाळय़ात  जनहिताची अनेक कामे रखडणार असून विकासकामांवर परिणाम होणार आहे.

जिल्हा नियोजन समित्यांना मोठय़ा प्रमाणात निधीचे वाटप झाल्याचा आरोप नवीन सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर करण्यात आलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर निर्णय घेणार

नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर कामांच्या यादीचे या पालकमंत्र्यांकडून पुनर्विलोकन केले जाणार आहे. त्यानंतर ही कामे चालू ठेवायची की नाहीत याबाबत नवीन पालकमंत्री निर्णय घेणार आहेत. यामुळे सध्या सुरू असलेली कामे किमान महिनाभर तरी रखडली असून पुढे ती सुरू होतील की नाही ही बाब नवीन पालकमंत्री काय निर्णय घेतात यावर अवलंबून आहेत.