
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची परकीय गंगाजळी सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयने आपल्या सोन्याच्या साठ्याचा काही भाग विकल्याची चर्चा होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रिझर्व बँकेने 12 अब्ज डॉलर मूल्याच्या सोन्याची विक्री केल्याचे सर्व आरोप केंद्रीय अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत. आरबीआयने असे कोणतेही सोने विकलेले नाही, असे स्पष्टीकरण मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.
ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने केलेल्या दाव्यानुसार, रुपयावरील वाढता दबाव आणि आयातीचा वाढता खर्च पाहता परकीय चलन साठ्याचे रक्षण करण्यासाठी आरबीआयने मोठ्या प्रमाणावर सोने विक्री केली. त्याचवेळी आरबीआयने अंदाजे 7.5 अब्ज डॉलर्सची परकीय चलन खरेदी केले असण्याची शक्यता आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेचा नुकताच प्रसिद्ध झालेला 2025-26 चा वार्षिक अहवाल या दाव्यांच्या पूर्णपणे विरूद्ध माहिती दर्शवतो. मोठ्या प्रमाणावर सोने विकण्याऐवजी, या आर्थिक वर्षात बँकेच्या सोन्याच्या साठ्यात प्रत्यक्षात वाढ झाली असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.
स्वर्ण धारिता संबंधी स्पष्टीकरण
Clarification on gold holdingshttps://t.co/JrCUhWWEHo— ReserveBankOfIndia (@RBI) June 3, 2026
आरबीआयच्या अहवालातील अधिकृत आकडेवारीनुसार, 31 मार्च 2025 पर्यंत आरबीआयकडील सोन्याचा साठा 879.58 मेट्रिक टन इतका होता, जो 31 मार्च 2026 पर्यंत वाढून 880.52 मेट्रिक टन झाला आहे. म्हणजेच वर्षभरात सोन्याच्या साठ्यात 0.94 मेट्रिक टन सोन्याची भर पडली असून यात कोणतीही घट झालेली नाही. या एकूण सोन्यापैकी 312.32 मेट्रिक टन सोने हे ‘इश्यू डिपार्टमेंट’ची मालमत्ता म्हणून ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित 568.20 मेट्रिक टन सोने ‘बँकिंग डिपार्टमेंट’ अंतर्गत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. असे वृत्त एएनआयने दिले आहे.
A news report published by @Bloomberg states that RBI may have sold gold amounting to approximately USD 12 billion.#PIBFactCheck
❌ This claim is FAKE
✔️ According to @RBI, the share of gold in India’s foreign exchange reserves rose from 13.92% at end-September 2025 to 16.70%… pic.twitter.com/eVjxPxEv1i
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 3, 2026
या वार्षिक अहवालातून हिंदुस्थानचा परकीय चलन साठा स्थिर स्थितीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी 668.33 अब्ज डॉलर असलेला परकीय चलन साठा 31 मार्च 2026 पर्यंत 691.11 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तसेच, सोन्याच्या ठेवींसह एकूण सुवर्ण साठ्याचे मूल्य गेल्या वर्षीच्या 78.18 अब्ज डॉलरवरून थेट 115.40 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. आरबीआयच्या या अधिकृत आकडेवारीवरून मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा मोठा साठा सुरक्षित असून 12 अब्ज डॉलरच्या सोने विक्रीच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याची माहिती आहे.
आरबीआयने 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकले? ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या बातमीने खळबळ


























































