
सामना प्रतिनिधी, मुंबई
तूरडाळीच्या विक्रमी उत्पादनामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी सरकारला तूर विकत घ्यावी लागली. तब्बल 25 लाख क्विंटल खरेदी केलेली तूर विकताना सरकारला भावासाठीही खूप घासाघिस करावी लागली. त्यामुळे 55 रुपये किलोने घेतलेली तूरडाळ 35 रुपयांना विकावी लागली आहे. सरकारने तब्बल 1275 कोटी रुपये खर्चून ही डाळ खरेदी केली असली तरी ती विकताना सरकारला 514 कोटी रुपयांची तूट सहन करावी लागली आहे.
सरकारी गोदामातील ही तूर इतर राज्यांना विकण्याचा प्रयत्न सरकारने केला, मात्र अन्यत्र यापेक्षा कमी दराने तूरडाळ उपलब्ध असल्याने या राज्यांनी ती तूरडाळ नाकारली. त्यामुळे सरकारला कोटय़वधींचे नुकसान सहन करावे लागले आहे.
मोठमोठय़ा मॉल्सनीही नाकारली
एकीकडे सरकार 60 रुपये किलोने तूरडाळ विकत असताना बाहेर सामान्य ग्राहकांना मात्र 120 रुपये किलोने ही तूरडाळ मिळत होती. अशावेळी मोठमोठय़ा मॉल्सना 50 रुपये दराने तूरडाळ विकण्याची तयारी सरकारने ठेवली, मात्र त्यांनी ती नाकारली. अखेर सरकारच्या पणन विभागाने सरकारच्याच अन्य विभागांना 35 रुपये प्रतिकिलो दराने तूर विक्री करण्याचा निर्णय घेतला.
यंदा डाळी कडाडणार; तूर, मूग, उडदाचे उत्पादन घटणार
पावसाने दिलेली ओढ आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे यंदा खरीपाचा हंगाम अद्याप कोरडाच गेला आहे. ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर डाळी, कडधान्याचे उत्पादन होते अशा विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक भागांत अद्याप पाऊसही सुरू झाला नाही. यामुळे मागील वर्षी क्विंटलमागे 5675 रुपये असलेला तुरीचा दर 5800 रुपयांवर गेला आहे. मूगडाळीचा दर 6975 रुपयांवरून 7050 रुपयांवर गेला आहे. उडदाचा दर 5,600 रुपयांवरून 5700 रुपयांवर गेला आहे. हा आतापर्यंतचा दर असून पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्यातील डाळीचे उत्पादन घटले आहे. यामुळे या वर्षी तूर, मूग, उडीद सर्व डाळींचे भाव कडाडणार आहेत.




























































