ओहळात बुडालेल्या मुलाचा मृतदेह 24 तासांनंतर सापडला

3

सामना प्रतिनिधी । पणजी

दक्षिण गोव्यातील डोंगरी-नावेली येथे सोमवारी सायंकाळी ओहोळात बुडालेल्या दीपक खत्री या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह तब्बल 24 तासानंतर मांडप पुलाजवळ आज सायंकाळी सापडला. ज्या ओहोळात दीपक बुडला होता त्या ओहोळात मोठ्या प्रमाणावर झाडी असून, त्यात प्लास्टिक कचरा अडकून पडला होता. शोधकार्य करणा-यांनी हा कचरा साफ करण्यास सुरुवात केल्यानंतर या झाडीत अडकून राहिलेला दीपकचा मृतदेह सापडला.

ओहोळाच्या काठावर राहाणारा दीपक व त्याचे अन्य मित्र ओहोळाच्या काठी सायकल चालवत असताना सोमवारी सायंकाळी तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. रविवारी रात्री पडलेल्या संततधार पावसामुळे हा ओहोळ भरून वाहत होता. ही दुर्घटना घडल्यानंतर सुमारे तासभराने त्या मुलांनी ही घटना बाकीच्याना दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने शोधकार्यास सुरुवात केली मात्र त्याची सायकल पाण्यात सापडली मात्र तो सापडू शकला नव्हता. त्यामुळे मंगळवारी सकाळी नौदलाच्या डायव्हर्सना पाचारण करण्यात आले. एकूण सहा डायव्हर्स या शोधकामात सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी सांगेतील खासगी डायव्हर फ्रान्सिस्को बार्रेटो हे देखील शोधकार्यात सामील झाले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी स्थानिक आमदार लुईझिन फालेरो यांनी घटनास्थळावर धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर स्वत:ही त्यांच्या बोटवर चढून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळीही ते घटनास्थळी हजर होते. शेवटी सायंकाळी दीपकच्या मृतदेहाचा शोध लागला.