मोबाईल होणार महाग, जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा केंद्राचा निर्णय

840

केंद्र सरकारने शनिवारी मोबाईलवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोबाईलवरील जीएसटीमध्ये 6 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. यामुळे नव्याने मोबाईल घेणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

शनिवारी जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये मोबाईलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मोबाईल फोन आणि मोबाईलच्या खास अन्य उपकरणांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सीतारामण म्हणाल्या. जीएसटी वाढल्यामुळे मोबाईलच्या किंमतीही वाढणार आहेत. याचा थेट परिणाम मोबाईल खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर होणार आहे.

अनेक संघटनांचा विरोध
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयाला अनेक संघटनांनी विऱोध केला आहे. कॅट आणि ऑल इंडिया मोबाील रिटेलर असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्रही पाठवले आहे. या पत्रामध्ये मोबाईल फोनवरील जीएसटी न वाढण्याची मागणी केली. सध्याच्या स्थितीमध्ये जीएसटीमध्ये वाढ केल्यास मोबाईल ग्राहक आणि रिटेलर व्यावसायिकांवर प्रभाव पडेल असे संघटनांचे म्हणणे आहे. मात्र तरीही केंद्राने जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मोबाईल कंपन्यांनाही बसणार आहे. आधीच कोरोना व्हायरसमुळे गोत्यात आलेल्या कंपन्यांना यामुळे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे.

केंद्राचे आणखी निर्णय
हाताने आणि मशीनने बनवलेल्या काडीपेटी (माचिस)वर 12 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.
विमानांची देखरेख, दुरुस्ती आणि अन्य सेवांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या