
सामना ऑनलाईन । पाटण
गुजरात काँग्रेसचे नेते आणि दलित आमदार अल्पेश ठाकोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अल्पेश ठाकोर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पैसे उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाटण जिल्ह्यातील असून एका भक्ती संगीत कार्यक्रमामध्ये स्टेजवर दहा रुपयांच्या नोटा उडवताना अल्पेश ठाकोर दिसत आहेत.
#WATCH: Gujarat Congress leader Alpesh Thakur showers money at a devotional programme in Patan. #Gujarat (16.6.2018) pic.twitter.com/hjVKK4wpPa
— ANI (@ANI) June 18, 2018
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ शनिवारी रात्रीचा असून राधनपूर शहरातील भाभर रोडवरील सदाराम कुमार विद्यालयाजवळ आयोजित कार्यक्रमातील आहे. राधनपूरमध्ये मुलींसाठी वसतीगृह उभारणी करण्यात येणार असून त्याची देणगी गोळा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये राधनपूरचे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोरही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अथिती गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख अमित चावडा हे होते. याच कार्यक्रमादरम्यान अल्पेश ठाकोर आणि अन्य कार्यकर्ते पैसे उधळताना दिसत आहे. आमदाराच्या या कृतीवरून वाद सुरू झाला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांसंबंधी जारी केलेल्या अटी व नियमांनुसार, नोटांचा वापर हार बनवण्यासाठी, सजावटीसाठी आणि कोणत्याही कार्यक्रमात उडवण्यासाठी करण्यास मनाई आहे. परंतु खुद्द आमदारांनीच हा नियमांचा भंग केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या वादाबाबत अल्पेश ठाकोर यांनी विचारणा करण्यात आली असता त्यांनी मुलींचे शिक्षण या चांगल्या कामासाठी आपण तसे केल्याचा दावा केला आहे.
‘पूर्वी लोकं आपलं शक्तिप्रदर्शन आणि लोकप्रियता वाढावी यासाठी पैसे उडवत होते परंतु मी मुलींच्या शिक्षणासाठी पैसे उडवले. माझ्या या कृतीमुळे वाद निर्माण होईल हे मला आधीपासून वाटत होते, परंतु ते सर्व बाजूला ठेवा कारण मी चांगल्या कामासाठी पैशांचा वापर केला आहे. मी फक्त १० रुपयांच्या नोटा उडवल्या. या कार्यक्रमामध्ये माझ्या व्यतिरीक्त अन्य १५ आमदारही उपस्थित होते’, असे आमदार अल्पेश ठाकोर आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हणाले.
























































