
राष्ट्रीय विक्रमवीर गुलवीर सिंहने 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावित आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या पदकाचे खाते उघडले. याचबरोबर सर्व्हिन सॅबेस्टियननेही 20 किमी चालण्याच्या शर्यतीत हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला.
2023 च्या आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या 26 वर्षीय गुलवीर सिंहने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत 28 मिनिटे 38.63 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मात्र, त्याचा राष्ट्रीय विक्रम 27 मिनिटे 22 सेकंद वेळेचा आहे. जपानच्या मेबुकी सुजुकीने 28 मिनिटे 43.84 सेकंद वेळेसह रौप्य, तर बहरीनच्या अल्बर्ट किबिची रोपने 28 मिनिटे 46.82 सेकंद वेळेसह कांस्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर हा तिसरा हिंदुस्थानी पुरुष धावपटू ठरला. याआधी, हरिचंद्र (1975) व जी. लक्ष्मणन (2017) यांनी या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.
सर्व्हिन सेबेस्टियनने पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत 1 तास 21 मिनिटे 13.60 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकून हिंदुस्थानच्या पदकाची बोहणी केली. चीनच्या वांग झाओझाओ याने 1 तास 20 मिनिटे 36.90 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या केंटो योशिकावा याने 1 तास 20 मिनिटे 44.90 सेकंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली.
अन्नू राणीकडून निराशा
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हिंदुस्थानच्या अन्नू राणीने आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत निराशा केली. महिलांच्या भालाफेक स्पर्धेत ती चौथ्या स्थानी राहिली. अन्नूने या स्पर्धेत 58.30 मीटर भालाफेक केली. कांस्यपदक विजेत्या जपानच्या सेई टाकेमोटो याने 58.94 मीटर भालाफेक करत कांस्यपदक जिंकले. चीनच्या सु लिंगदान हिने 63.29 मीटर भालाफेक करीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या मोमोन उएदाने 59.39 मीटर फेकी करीत रौप्यपदकाला गवसणी घातली.