
सामना ऑनलाईन,मुंबई
गुरुपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिकांची आज रीघ लागली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या यशस्वी वाटचालीतून प्रेरणा घेण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली. गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठय़ा भक्तिभावाने ‘मातोश्री’वर साजरा झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करताना शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुखांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होत शिवसैनिकांनी चाफ्याची फुले अर्पण केली.
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. तरीही अत्यंत शिस्तीने शिवसैनिक ‘मातोश्री’वर दाखल होत होते. शिवसेनाप्रमुखांना प्रिय असणाऱ्या सोनचाफ्याच्या सुगंधाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे समाधान आणि शिवसेनाप्रमुखांच्या सिंहासनासमोर नतमस्तक होताना शिवसैनिकांना धन्य वाटत होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या शिवसैनिकांची उद्धव ठाकरे आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते.
शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विधान परिषद उपसभापती ऍड. नीलम गोऱहे, महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विजय कदम, उपनेत्या मीना कांबळी, आमदार अजय चौधरी, तुकाराम काते, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, ज्ञानराज चौगुले, विलास पोतनीस, सदानंद चव्हाण, राजन साळवी, राहुल पाटील, रूपेश म्हात्रे, तृप्ती सावंत, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब, मंगेश सातमकर, राजेंद्र राऊत, आशीष चेंबूरकर, रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी आमदार दगडू सकपाळ, दै. ‘सामना’चे प्रमुख वितरक बाजीराव दांगट, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, नगरसेवक सचिन पडवळ, रमेश कोरगावकर, तेजस्विनी घोसाळकर, सुजाता पाटेकर आदी उपस्थित होते.

























































