
>> गुरुनाथ तेंडुलकर
सहा महिन्यांपूर्वी मी एका मित्राच्या नातवाच्या पाचव्या वाढदिवसाला गेलो होतो. इवल्याशा त्या मुलाला काय द्यायचे हा मोठाच प्रश्न माझ्यासमोर होता. पाकिटात पैसे घालून देणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. अखेरीस खूप विचार करून मी त्याच्यासाठी छोटासा फुटबॉल आणि त्यात हवा भरण्याचा पंप घेतला.
त्यानंतर कालच मी पुन्हा एकदा त्या मित्राच्या घरी काही कामानिमित्त गेलो होतो. शनिवार असल्यामुळे मित्राचा मुलगा आणि सूनदेखील घरी होते. बाहेर दिवाणखान्यात भिंतीवरच्या भल्यामोठ्या टीव्हीवर मित्राचा मुलगा आणि नातू असे बापलेक दोघं जण हातात
प्ले स्टेशन घेऊन टीव्हीवर फुटबॉल खेळत होते. हातातील बटणं दाबून एकमेकांवर गोल करत होते. त्या लहान मुलाबरोबर त्याचा बापदेखील तेवढाच रंगात येऊन टीव्हीवर फुटबॉल खेळत होता. मित्राची सून उभी राहून नवऱ्याचं आणि मुलाचं कौतुक पाहत होती.
मी तो प्रकार बघून हबकूनच गेलो. मोकळ्या मैदानात खेळायचा फुटबॉलचा खेळ टीव्हीच्या पडद्यावर खेळतात? अखेरीस न रहावून मी विचारलं,
“हे काय? टीव्हीवर का फुटबॉल खेळताय? मी या छोट्याला खराखुरा फुटबॉल गिफ्ट दिला होता ना?” माझ्या या प्रश्नाचं उत्तर छोट्याच्या आईनं दिलं.
“काय सांगू काका, तुम्ही दिलेला फुटबॉल घेऊन आमचा चिनू दोन दिवस खाली गेला होता. त्याच्यासोबत खेळायला सोसायटीत कुणीच मुलं नव्हती. म्हणून हा इस्त्राrवाल्या भैय्याच्या तीन-चार मुलांबरोबर खेळायला लागला. दोन्ही दिवस पडला. कपडे मळवून आणि ढोपरं फोडून घरी आला. दुसरेच दिवशी
अॅमेझॉनवरून हा गेमिंग कंसोल ऑर्डर केला. यात सगळे खेळ आहेत. फुटबॉल, हॉकी, ािढकेट, स्केटिंग, बॉक्सिंग, अगदी ज्यूडो कराटेसुद्धा…” मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून लहानग्या मुलावर संस्कार करणाऱ्या त्या आई-बापाला साष्टांग दंडवत घातला.
अलीकडे गेल्या काही वर्षांपासून शहरी आणि निमशहरी भागात मुलांचे एकूण खेळच झपाट्याने बदलताहेत. पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले विटीदांडू, आबाधोबी, आट्यापाट्या, लंगडी, डब्बा ऐसपैस, लगोरी हे खेळ तर पार नामशेष झालेत, पण कब्बडी, खोखो,
फुटबॉल, हॉकीसारखे मैदानी खेळदेखील मुलं फारशी खेळताना दिसत नाहीत. फुटबॉल, हॉकीच्या मॅचेस होतात. कब्बडीच्या लीग्ज भरवल्या जातात. ते सामने आपण टीव्हीवर पाहतो, पण प्रत्यक्षात मात्र हे खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी होतेय. याची कारणं शोधायला गेलो तर अनेक कारणं सापडतील, पण सर्वात प्रमुख कारण म्हणजे टीव्ही आणि मोबाइलचा अतिरिक्त वापर. टीव्हीच्या सोबतीला मोबाइल आहेच. मोबाइलवर व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर टाइमपास सुरू असतोच. त्यामुळे सगळे खेळ हे केवळ व्हर्चुअल म्हणजेच आभासी खेळले जाऊ लागले आहेत.
हं…अर्थात नियमाला काही अपवाद असतात. काही आई-बाप आपल्या मुलांना स्विमिंग, फुटबॉल, बॅडमिंटन सारख्या खेळासाठी जवळच्या क्लबमध्ये घेऊन जातात. काही पालक आपल्या मुलांना गाणं शिकवतात, नाचाच्या क्लासला घेऊन जातात. त्यातून काही मुलं गाणी गाऊन, नाच करून टीव्हीवरच्या रिअॅलिटी शोमध्ये चमकतात. आपण अशा लहान मुलांना ‘लिटिल चॅम्प’ म्हणतो. त्यांचं कौतुक करतो, पण त्या मुलांच्या यशात पालकांचा मोठा वाटा असतो.
असो… कोवळ्या वयातल्या मुलांचं बालपण हे पीनपुरतं मर्यादित न ठेवता त्यांना बाहेरचं प्रत्यक्ष जग अनुभवण्याची संधी द्यावी हे पालकांना सांगणारी आजची कविता… कवितेचं शीर्षक आहे ‘असे नको तसे करू’ आणि कवियत्री आहेत लता गुठे. लताताईंनी कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेख असे अनेक साहित्यप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. त्या स्वत ‘धमाल मस्ती’ या खास मुलांसाठी निघणाऱ्या दिवाळी अंकाच्या संपादिका आहे. तसंच त्या ‘ताऱ्यांचं जग’ नावाचा दिवाळी अंक संपादित करतात. ‘भरारी प्रकाशन’ नावाची त्यांची स्वतची प्रकाशन संस्था असून त्यांनी अनेक नामवंत तसंच नवोदित लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. लताताईंच्या लेखनाचा आणखी एक पैलू म्हणजे त्या स्वत उत्तम बालसाहित्य लिहितात.
आजची त्यांची कविता ही एक बालकविता आहे, पण बालकविता असली तरी ती केवळ बालकांपुरती मर्यादित न रहाता बालकांच्या पालकांनी त्यातून योग्य तो बोध घ्यावा असं मला वाटतं.
असे नको तसे करू
फेसबुकवर चॅटिंग, नको ग बाई
भातुकलीसारखी मजा, फेसबुकवर नाही
एका जाग्यावर बसून दुखते मान, पाठ
वाचण्यासाठी मेसेज, डोकं ठेवावं लागतं ताठ
रोज मी बुद्धिबळ दादासंगे खेळते
मेंदूचा होतो व्यायाम, स्मरणशक्ती वाढते
नको पाहू टीव्ही बंड्या, डोळ्यांचा नंबर वाढणार
ढापण्या ढापण्या म्हणून मित्र सारे चिडवणार
कार्टून पाहिलं सारखं की आई रागे भरते
नाही झाला अभ्यास की टीचर शिक्षा करते
दंगा-मस्ती थोडीशी, थोडावेळ टीव्ही पाहू
अभ्यास करून आपण खूप-खूप मोठे होऊ































































