परभणीच्या बसस्थानकाला सांडपाण्याचा विळखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हे थोडा पाऊस आला तरी घाणीच्या विळख्यात सापडल्या जाते. याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नाल्याचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी हे बसस्थानक परिसरातून थेट बसस्थानकात शिरल्या जाते. प्रवाशांना असनावर कसरत करुन बसावे लागत आहे. परभणीचेच बसस्थानक नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकाची दुरावस्था अशाच प्रकारे होत आहे. दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

‘नेहमीची येतो पावसाळा’ या उक्ती प्रमाणे परभणीतील बसस्थानक हे प्रत्येक पावसाळ्यात घाणीच्या विळख्यात सापडल्या जाते. सखल भागात बसस्थानकाची उभारणी करण्यात आल्याने परभणी शहरातील निरज हॉटेलपासून आलेला मोठा नाला हा संरक्षण भिंत नसल्याच्या कारणाने थेट घाण पाण्याचा विळखा बसस्थानकाला बसतो. महानगरपालिका आणि एस.टी. महामंडळ एकमेकांवर जबाबदारी ढकलून प्रभावी उपाययोजना करत नाहीत. कसे बसे पावसाळ्याचे चार महिने मोठ्या त्रासात काढले जातात. पावसाळ्यात आलेली घाण टप्प्या-टप्प्याने कमी कमी निसर्गनियमाप्रमाणे होते. याचा प्रत्येय अनुभवास येतो. मात्र कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. तसेच पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका नाला साफसफाईचे काम करत नाही. ते सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. बसस्थानकाची संरक्षण भिंत अत्यंत कुचकामी असल्याने मोठा फटका बसतो. परिणामी घाणीच्या विळख्यात बसस्थानक अडकल्याचा प्रत्यय वारंवार येतो.

शहरातील बसस्थानकात पाऊस पडल्यानंतर नाल्यातील पाणी बसस्थानकांमध्ये येत आहे. तसेच बसस्थानकांत जागोजागी पाण्याचे डोह साचत असल्यामुळे बसस्थानकाला गटाराचे स्वरुप आले आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधितांनी बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. एकीकडे आपले गाव, आपले शहर, आपला परिसर स्वच्छ ठेवावा यासाठी शासनस्तरावरुन मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. परंतु परभणी शहरातील बसस्थानक परिसरात मात्र मागील अनेक दिवसांपासून पावसाचे पाणी जागोजागी साचत आहे. तसेच परिसर चिखलमय झाला आहे. प्रवाशांना चिखलमय रस्त्यातून ये जा करावी लागत आहे. त्यातच परिसरातील नाल्यातील पाणी बसस्थानकामध्ये येत असल्यामुळे दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानक परिसरात स्वच्छता ठेवावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. परंतु, बसस्थानकांतील अधिकाऱ्यांना मात्र स्वच्छतेचा विसर पडला की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. बसस्थानकांतील स्वच्छतेकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.