ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नैसर्गिक वायू आणि तेल कंपनीच्या (ओएनजीसी) तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात असलेल्या लकुआ क्षेत्रातील रिंग साईटवरून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले असून उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांनी हे कृत्य केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. ज्या गाडीतून कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले, ती सापडली असून अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. अज्ञात बंडखोरांनी कर्मचाऱ्यांचे अपहरण करताना ओएनजीसीच्याच गाडीचा वापर केला. ही गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली. याप्रकरणी ओएनजीसी प्रशासनानं स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.