ग्वाल्हेरमध्ये थंडीचा कहर, हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 31 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरसह इतर अनेक शहरात गेल्या 15 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या 6 दिवसांपासून इथल्या लोकांनी सूर्य देखील पाहिलेला नाही. या कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या सगळ्याच्या परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. येथील थंडींमुळे हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचे रुग्णही वाढू लागले आहेत.

थंडी वाढल्याने ग्वाल्हेर येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयात दररोज सुमारे 30 ते 35 रुग्ण येत असून, त्यापैकी तीन ते चार रुग्ण दगावत आहेत. गेल्या सहा दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ब्रेन स्ट्रोकमुळे 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. जयआरोग्य रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव कवी भार्गव हे या विषयी बोलताना म्हणाले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हृदयरुग्णांच्या संख्येत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रुग्णालयात येण्यापूर्वीच काही जणांचा मृत्यू होतो तर काहींना वाचवणे कठीण असते. तसेच कोविडनंतर हृदयविकाराच्या रुग्णसंखेत वाढ होऊ लागली आहे असे त्यांनी सांगितले.

रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. राम रावत म्हणाले की, जेव्हा थंडी वाढते तेव्हा हृदयासंबंधीत आजारही झपाट्याने वाढतात. शरिरातील रक्तदाब वाढतो. त्यामुळे अश्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. या रुग्णांची सरासरी लक्षात घेता सरकारी रुग्णालयातील रुग्णांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे, तर खासगी रुग्णालयातील हृदयविकाराच्या रुग्णांची संख्याही 40 टक्क्यांनी वाढली आहे.