
सामना ऑनलाईन । नागपूर
उन्हाळ्याच्या दिवसांत अंगातून घामाच्या धारा वाहण्याचा मोसम असताना जिह्यातील सावनेर, रामटेक, मौदा तालुक्यांतील रहिवाशांना सिमल्याचा क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी वादळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. त्यात संत्रा, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
केळवद, हत्तीसरा खैरे, ढालगाव, नांदुरी, खामगाव, खापा, गडेगाव, अजनी, शिर्डी येथे बुधवारला मुसळधार पावसासह गारपीट झाली. हाताशी आलेला गहू, संत्रा, हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. गारपीटीची तीव्रता इतकी अधिक होती की शेत व घरांच्या अंगण व छतावर गारांचे थर साचले होते. वादळी पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडल्याच्या घटना घडल्या. गावरान आंब्याचा मोहर व काही ठिकाणी कैऱ्या गळून पडल्या. त्यामुळे बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले. काही शेतकऱ्यांच्या घराच्या अंगणात ठेवलेला कापूस ओलाचिंब झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात आलेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक आलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाने सोमवार रात्रीपासून उग्र रूप दाखवायला सुरुवात केली. कृषी विभागाने पंचनामे करून तत्काळ बळीराजाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
मनसरात लिंबाएवढय़ा गारा
बुधवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. लिंबाएवढय़ा तर काही कमी आकाराच्या गारा पडल्यात. शेतातील बांधावर पांढराशुभ्र गारांचा सडा दिसून येत होता. परिसरातील शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबी आणि लिंबू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, मनसर परिसरात मोठय़ा संख्येने विटांची राउंडभट्टी आहे. कच्च्या विटांची पार माती झाली असून त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.





























































