केरळमधील सभेत हमासच्या नेत्याचे भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या मलप्पुरममध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत हमासचे नेते खालेद मशाल याने भाषण केले. मशाल याने ऑनलाईन भाषण केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. हमासचा नेता खालेद मशाल याने शुक्रवारी मलप्पुरममधील सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटने आयोजित केलेल्या सभेत ऑनलाईन उपस्थिती लावली. सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंट ही जमात-ए-इस्लामीची युवा शाखा आहे . या संघटनेने मलप्पुरममध्ये मोर्चा काढला होता. त्यात “बुलडोझर हिंदुत्व आणि वर्णभेदी ज्यूवाद उखडून फेका अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी या मोर्चाबाबत आणि मशेल यांनी केलेल्या भाषणाबाबत बोलताना म्हटले की, ‘केरळमधील मलप्पुरममधील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हमास नेता खालेद मशाल याने केलेले भाषण हा चिंतेचा विषय आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केरळ पोलीस आहेत कुठे ? असा सवाल सुरेंद्रन यांनी विचारला आहे. ‘सेव्ह पॅलेस्टाईन’च्या नावाखाली, ‘हमास’ या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांचा ‘योद्धा’ म्हणून जयजयकार केला जात असून ही गोष्ट गंभीर आहे असे सुरेंद्रन यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, हमासच्या दहशतवाद्याने केरळमध्ये भाषण केले आणि तेथील हिंदूंना संपवण्याची भाषा केली. हिंदुस्थानात असे अनेकजण आले पण काहीही करू शकले नाहीत. हमासचाही तशाच पद्धतीने नाश होईल… हिंदुस्थान पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे पण प्रियंका गांधी मतांसाठी दहशतवादी हमासच्या पाठीशी उभ्या आहेत.

केरळमधील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) आघाडीतील IUML ने गुरुवारी उत्तर कोझिकोडमध्ये एक मोर्चा काढला होता. गाझामध्ये इस्रायल करत असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. IUML च्या पनाक्कड सय्यद सादिक अली शिहाब थांगल यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. याच मोर्चात भाषण करत असताना काँग्रेस नेते शशि थरूर यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले होते. थरूर यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. थरूर यांच्या या विधानानंतर 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘महल एम्पॉवरमेंट मिशन’च्या कार्यक्रमात थरूर यांना सहभागी करून न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

इस्रायलचा हमासच्या 250 तळांवर हल्ला

इस्रायल आणि हमासचे युद्ध आणखी चिघळले असून इस्रायलने गुरुवारी गाझा पट्टीतील हमासच्या 250 तळांवर हवाई हल्ले केले. इस्रायलचे सैनिक रणगाडय़ांसह गाझा पट्टीत घुसले असून आता रस्त्यावरची रक्तरंजित लढाई सुरू झाली आहे. हमासचे तळ, कमांडर सेंटर, बंकर्स आणि रॉकेट लाँचर्सची ठिकाणे इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आली. खान युनिस शहरामध्ये मशिदीजवळ मिसाईल पॅडवर हल्ला चढवण्यात आला. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात आपल्या ताब्यातील 50 ओलीस ठार झाल्याचा दावा हमासने केला आहे.

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ले चढवले. हे हल्ले आपण रोखू शकलो नाही हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अखेर मान्य केले आहे. बुधवारी रात्री इस्रायलचे सैन्य रणगाडय़ांसह उत्तर गाझात घुसल्याची माहिती इस्रायलच्या सैन्यदलाने दिली आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या विनंतीनुसार इस्रायल जमिनीवरील हल्ले काही काळ थांबवू शकतात. इस्रायलने हिजबुल्लाहला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण लेबेनॉनमध्ये रात्रभर हल्ले चढवले. त्यानंतर हिजबुल्लाहच्या म्होरक्याने हमास आणि इस्लामिक जिहादच्या नेत्यांशी होणारी बैठक रद्द करत एक पाऊल मागे घेतले.