
मशिदीवरील भोंग्याना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी हनुमान जयंतीला हनुमानचालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. हा सगळा प्रकार म्हणजे राजकीय जयंती साजरा करण्याचा प्रकार असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. प्रभू श्रीराम, हनुमान हे आमचे कायम श्रद्धास्थान, शक्तीस्थान आहेत. ही सर्व दैवते आहेत आणि ती सदैव आमच्याच पाठिशी उभी राहिली असल्याचे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘रामाचे धनुष्यही आमच्याकडे आहे आणि हनुमानाची गदा सुद्धा आमच्या हातामध्ये आहे.’ राऊत पुढे म्हणाले की राम आणि हनुमानचे कितीही राजकारण केले तरी कोल्हापूरचा निकाल पाहिला असेल तर तुम्हाला हे कळेल की ही दोन्ही दैवते महाविकास आघाडीच्यापाठी आणि शिवसेनेच्या पाठीशी आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना मशिदीवरील भोंग्यांचा विषय भाजपने तापवण्यास सुरुवात केली होती. यावरून भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, ‘त्यांचा भोंगा वाजणार नाही. त्यांना जनता ठेंगा दाखवणार आहे.






























































