पराभव विसरा, चुका सुधारा अन् स्वतःला सिद्ध करा! कर्णधार हार्दिक पांडय़ाचा संघ सहकाऱयांना सल्ला

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पराभव विसरून आता पुढे जायला हवं. झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करा. न्यूझीलंड दौऱयावर युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे, असे आवाहन टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांडय़ाने आपल्या संघ सहकाऱयांना केले.

न्यूझीलंडच्या स्वारीवर आलेला हिंदुस्थानी संघ येथे तीन टी-20 सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. 18 नोव्हेंबरपासून हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यानची टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी या मालिकेतील ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना हार्दिक पांडय़ा म्हणाला, 2024 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी या न्यूझीलंड दौऱयापासून सुरू होत आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. वेस्ट इंडीज व अमेरिकेत आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. दोन वर्षांत भरपूर क्रिकेट खेळायला मिळणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना पारखण्यासाठी भरपूर वेळ आहे, असेही पांडय़ा म्हणाला.

– हिंदुस्थानचा टी-20 संघ ः हार्दिक पांडय़ा (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.