
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण खरी ठरवून दाखवलीय ती पंजाबमधील 24 वर्षीय हरविंदर कौर या तरुणीने. हरविंदरची उंची 3 फूट 11 इंच असून देशातली सर्वात कमी उंचीची वकील ती ठरली आहे. कमी उंचीमुळे एकेकाळी तिला लोकांकडून खूप ऐकावे लागायचे. आता तेच लोक तिच्या यशाची उदाहरण देत आहेत.
जालंदर कोर्टात प्रॅक्टिस करणाऱया हरविंदरला खरे तर हवाईसुंदरी व्हायचे होते, मात्र कमी उंची असल्यामुळे तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले. अनेक उपचार, मेडिटेशन करूनही त्याचा परिणाम तिच्या उंचीवर झाला नाही. त्यामुळे ती नाराज होती. त्यावेळी तिला मोटिवेशनल व्हिडीओने आधार दिला. हरविंदर म्हणाली, ‘देवाने मला जसं बनवलं आहे तसं मी स्वतःला स्वीकारलं आहे.
सोशल मीडियातून मला लोकांकडून भरपूर प्रेम मिळाले. त्यांच्यामुळेच माझी हिंमत वाढली. काही लोकांकडून वाईट कमेंट्स मिळाल्या. त्यामुळे मनात अनेकदा आत्महत्येचे विचारदेखील आले होते. मात्र त्याकडे मी दुर्लक्ष केले.’ बारावीनंतर कायद्याच्या क्षेत्रात हरविंदरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने लॉचे शिक्षण पूर्ण केले असून आता न्यायाधीश व्हायचे तिचे स्वप्न आहे.

























































