
सामना प्रतिनिधी । गारगोटी
गारगोटीसह भुदरगड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या वेदगंगा नदीला महापूर आला आहे. तर याच नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेली आहेत. गारगोटी म्हसवे मार्गावरील पुलावरून वेदगंगा नदीचे पाणी वाहत असलेने गारगोटीहून म्हसवे मार्गे मिणचे खोरीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तर पाटगाव धरण ६९ टक्के भरले आहे. गारगोटी कडगाव मार्गावर दंडोबा ओढ्यानजीक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली.
पाटगाव धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत१४२मिलिमीटर इतका प्रचंड पाउस झाला असून आज अखेर २५०२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे, गतवर्षी या तारखेपर्यंत१७४० मिलिमीटर पाऊस झाला होता. या मुसळधार पावसामुळे या धरणात ६८.१९०दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे, धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२४२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३.७१ टीएमसी आहे, या पावसामुळे धरण६९ टक्के भरले आहे, असाच पाऊस राहिला तर धरण लवकर भरण्याची शक्यता आहे, गटवर्षीच्या तुलनेत धरणात पाणीसाठा पावणे दोन मीटरने जास्त असलेचे पाटगाव मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी आर. आय. पाटील यांनी सांगितले.
पावसाळा सुरू झालेपासून मृग नक्षत्राने चांगली साथ दिली. आर्द्रामध्ये सुद्धा दमदार पाऊस सुरूच होता. त्यानंतर पुनर्वसू म्हणजेच तरणा नक्षत्र शुक्रवारपासून सुरू झाले आणि भुदरगड तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत असून वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. यंदा पावसाळ्यात वेदगंगेला प्रथमच महापूर आला असून पाणी नदीकाठावरील शेतात घुसले आहे. भुदरगडच्या पश्चिमेला तसेच पाटगाव धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस चालू असून पाटगाव धरणाची पाणी पातळी वाढली आहे. असाच पाऊस दोन झाल्यास धरण भरण्याची शक्यता आहे.































































