कडक उन्हाळ्यामुळे चिमुकल्यांना घरपोच मिळणार प्रगतीपुस्तक; सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडक उन्हामुळे उष्माघाताची भीती वर्तविण्यात आली असून, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे निकाल 29 एप्रिल किंवा उन्हाळा सुट्टीत जाहीर केला जाणार आहे. निकालानंतर प्रगतीपुस्तके घ्यायला विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत.

सोलापूर जिह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज जिल्ह्याचे तापमान सरासरी 40 सेल्सिअसपर्यंत आहे. दरवर्षी 1 मे रोजी शाळांचे निकाल प्रसिद्ध होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना शाळांमध्ये बोलावून त्यांची प्रगतीपुस्तके दिली जातात. पण, खारघर घटनेनंतर आरोग्य विभागासह शालेय शिक्षण विभागाने शाळांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रगतीपुस्तके पोच करतील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर, 1 मे ऐवजी आता 29 एप्रिलपर्यंत किंवा 1 मे नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या सोयीने प्रगतीपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करतील. सोलापूर जिह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळा आहेत. त्या अंतर्गत दोन लाख 10 हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना यंदा घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत.

दरम्यान, उष्माघातामुळे 12 जूनऐवजी 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान, पहिली ते पाचवीसाठी 200 दिवस, तर सहावी ते आठवीसाठी 220 दिवस अध्यापन होईल, यादृष्टीने पुढे शिक्षणाधिकाऱयांनी नियोजन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

सोलापूर जिह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने उष्माघाताची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमधील मुख्याध्यापकांनी त्यांच्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांची प्रगतीपुस्तके त्यांच्या घरी किंवा पालकांना द्यावीत. तशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. प्रगतीपुस्तके देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणीही शाळेत बोलावू नये.

– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद.