लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस; नद्या,ओढे वाहू लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर, लातूर

गेल्या अनेक वर्षात झाला नव्हता असा पाऊस संपूर्ण लातूर जिल्ह्यात झाला असून या पावसामुळे इथले नागरिक प्रचंड सुखावले आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं तिथल्या स्थानिकांनी म्हटलं आहे. निलंगा शहरात काही नागरी भागात कमरेइतके पाणी साठले होते, तर जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहायला लागल्या आहेत. काही ठिकाणी रस्ते, पुलाचा भराव वाहून गेल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचं स्थानिक वार्ताहरांनी कळवले आहे. या पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा बंद झाला.

लातूर जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, यावर्षी मात्र पावसाने लातूरकरांची दाणादाण उडवली आहे. मॉन्सून दाखल होण्यापूर्वी असा पाऊस गेल्या अनेक वर्षात झाला नव्हता. औसा तालुक्यातील सर्व मंडळात जोरदार पाऊस झाला आहे. निलंगा तालुक्यातील सहा मंडळातही अतिवृष्टी झाली आहे.

पावसाची आकडेवारी

  • औसा मंडळ- १०४ मि.मी.
  • बेलकुंड- ९६ मि.मी
  • भादा- ७० मि.मी
  • किल्लारी-७० मि.मी
  • किनीथोट-८२ मि.मी
  • लामजना-१२५ मि.मी
  • मातोळा-८३ मि.मी
  • निलंगा मंडळ- १२९ मि.मी
  • मदनसूरी-१५४ मि.मी
  • कासारबालकुंदा-९० मि.मी
  • अंबुलगा(बु) ६५ मि.मी
  • निटूर ७७-मि.मी
  • पानचिंचोली मंडळ-१४२  मि.मी

निलंगा तालुक्यातील लिंबाळा इथे लोअर तेरणाचा कॅनॉल फुटला, ज्यामुळे  आहे ५० पेक्षा  अधिक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या या तुफान पावसामुळे तेरणा नदीला पूर आला आहे.