
सामना प्रतिनिधी। मालवण
मालवणमध्ये पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवघ्या एका महिन्यात पावसाने दोन हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केल्याने नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, गुरुवारी अमावास्या असल्याने पावसाचा जोर वाढणार असून समुद्रातील पाण्याची पातळीही वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नदी नाल्यातील पाणी गावात शिरल्याने दुकाने व घरे पाण्याने वेढली गेली आहेत. काहींच्या घरातही पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी पडझडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पूरस्थितीमुळे काही भागात शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.
मालवण तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर बुधवारी दिवसभर पावसाने जोर कायम ठेवत संततधार सुरू ठेवली. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मोगरणे येथील महादेव गावडे यांच्या घरावर मंगळवारी रात्री १० वाजता माडाचे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पेंडूर येथील प्रभाकर सावंत यांचा मांगर अतिवृष्टीमुळे कोसळून ७० हजार रुपयाचे नुकसान झाले. तर कट्टा येथील दिगंबर भोजने यांच्या घराची भिंत कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले. गुरामवाडी येथील शासकीय सार्वजनिक विहीर कोसळून अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच मालवण एसटी आगाराची मालवण -कसाल कणकवली हि एसटी बस कणकवली वागदे येथे पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने त्याच ठिकाणी अडकली होती.
आचरा परिसरालाही दुपारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. पिरावाडी येथील समुद्र किनारी असलेल्या अजय धुरी यांच्या घरावर दुपारी आंब्याचे झाड पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र घरानजीक उभी असलेली शादाब मुकादम यांची सुमो गाडी या झाडाखाली सापडल्याने त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. झाड कोसळल्याचे समजताच पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटविण्यात आले. बुधवारी तलाठी ओरोस येथे गेल्याने या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवण- कसाल हमरसत्यावरील गुरामवाड़ी लिंगेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भला मोठा वटवृक्ष कोसळून रस्त्यावर पडला. त्यामुळे दोन्ही बाजुंनी होणारी वाहतुक सुमारे २ तास ठप्प झाली होती. सुदैवाने हा वृक्ष कोणत्याही वाहनावर अथवा वाहनचालकावर कोसळला नाही. त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. ही घटना बुधवारी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा वृक्ष स्थानिक ग्रामस्थ वाहनचालक एस. टी बसचे चालक वाहक यांनी एकमेकांच्या मदतीने फांद्या तोडून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला आहे. तिथून निघणारे वारे पश्चिम घाटात येत असून गोवा व कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसास पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या कोसळत असलेला पाऊस हा त्याचाच परिणाम असून १४ जुलै पर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहील अशी माहिती मुंबई विभागाचे हवामान तज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली.






























































