
गेले दोन दिवस मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. शनिवारी सकाळपासूनच येथे पावसाचा जोर वाढला होता. दिवसभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बावनदी, अर्जुना, कोदवली या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरीतील कळझोंडी धरण भरून वाहू लागले आहे, तर पानवल, शिळ धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
पांगरी रस्त्यावर दरड कोसळली
सततच्या पावसामुळे नव्याने बांधलेल्या बावनदी ते देवरुख रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पांगरी गावाजवळ दोन ठिकाणी मोठे दगड रस्त्यावर आले होते. पन्नास मीटरच्या भागात रस्त्यावर माती आल्यामुळे वाहनचालकांना ये-जा करताना कसरत करावी लागत होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बांधकाम विभागाने ठेकेदाराला माहिती दिली आणि माती, दगड हटवण्याच्या सूचना दिल्या. पोकलेनच्या मदतीने रस्त्यावर आलेली दरड बाजूला करण्यात आली. डोंगराकडील ज्या भागात फक्त माती आहे, तेथे पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने हाकताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवने ताम्हाणे रस्त्यावर दरड
संगमेश्वर तालुक्यातील शिवने-ताम्हाणे रस्त्यावर दरड कोसळल्याने याचा फटका वाहतुकीला बसला आहे. राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली आंबेलकरवाडी येथे यावर्षी बांधलेल्या संरक्षक भिंतीचा भराव खचला आहे. या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. कोदवली, अर्जुना नदीचे पाणी वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे पावसामुळे विलास पवार यांच्या घराजवळची भिंत कोसळली तर शंकर पवार यांच्या शौचालयाचे अंशतः नुकसान झाले. तसेच किल्ला दसपट वाडी येथील भागेश्वर मंदिर आवाराचा गडगा कोसळून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पऱ्या बंद झाला आहे.
परशुराम घाट बंद
गेले तीन दिवस कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे परशुराम घाटात शनिवारी रात्री दरड कोसळली होती. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून रात्रीच्यावेळी हा घाट बंद ठेवावा अशा सूचना पेढे सरपंच यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे सोमवारी रात्री बंद करण्यात आलेला परशुराम घाट तब्बल १६ तास बंद ठेवण्यात आला होता. तोपर्यंत छोटी वाहने चिरणी मार्गे मुंबईकडे जात होती. वाहतुकीच्या सुरक्षेची पहाणी केल्यानंतरच हा घाट सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे प्रशासनाने ठरवले होते. परिणामी कळंबस्ते चिपळूण आणि लोटे खेड या ठिकाणी अवजड वाहतूक करणारी सर्व वाहने अडकून पडली होती.
गडनदी धरण भरले
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाटबंधारे विभागाने नदी किनाऱ्याच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. गड नदीला पूर आला असल्याने माखजन बाजारपेठेत पाणी भरु लागले आहे. यामुळे व्यापारी वर्गाने आपला माल सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे . पावसाची संततधार सुरुच असल्याने संगमेश्वर , फुणगूस आदि भागातील नदी आणि खाडी किनाऱ्यालगतच्या व्यापारी आणि ग्रामस्थांनी आवश्यक ती काळजी घेतली आहे .






























































