
अमित खोत । मालवण
सिंधुदुर्गात गेले तीन दिवस संततधार बरसत असलेल्या पावसाचा जोर बुधवारी अधिकच वाढला. धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाने रस्ते जलमय झाले असून अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रस्ते तसेच वीज खांबांवर झाडे पडल्याने काही मार्गावरील वाहतूक तसेच वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला व देवगड या तीनही तालुक्यांनी आतापर्यंत एक हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. देवगड तालुक्यात आतापर्यंत २० दिवसात सर्वाधिक १ हजार २५९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसाच्या जोरदार सरींनी कोकणातील बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र संततधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र निर्माण झाले असून जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. मालवणात सखल भागातील घरात पाणी शिरले असून बाजरपेठ भागातील रस्त्यांवर एक ते दोन फूट पाणी साचले आहे. पावसाचा हा जोर आगामी दोन दिवस असाच राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रस्ते तसेच वीज खांबांवर कोसळली झाडे
किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर कोसळलेल्या झाडांमुळे काही काळ वाहतूक ठप्प होण्याच्या घटना अनेक मार्गावर दिसून आल्या. तर वीज खांब व वीज तारांवर झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.
समुद्र खवळला
धुव्वाधार पावसामुळे समुद्रही खवळला असून जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. पर्यटकांनी समुद्र तसेच समुद्रालगत असलेल्या खडकाळ भागांपासून दूर रहावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात २० दिवसात ५ हजार ९७१ मिलिमीटर पावसाची नोंद
दोडामार्ग – दिवसभरात ५८ मिमी (एकूण ७३३ मिमी)
सावंतवाडी – १५३ (६७२)
वेंगुर्ला – १७५ (१०२६.८)
कुडाळ – १०६(८५६)
मालवण – १९० (११८१)
कणकवली -६९(५८६)
देवगड – -२७५(१२५९)
वैभववाडी -१०(६५८)
एकूण – १०३६ (५९७१.९) अशी पावसाची नोंद बुधवार पर्यंत करण्यात आली आहे.


























































