
पुणे शहर व जिह्यात काल रात्री रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. रस्त्यांच्या नद्या झाल्याने भररस्त्यातील पाण्यात वाहने वाहून गेली. काही बुडाली. घरे, बाजारपेठां, पंधरा वस्त्या आणि दुकानांमध्ये पाणी घुसले. शहरात 57 ठिकाणी तळे झाले. मेट्रोच्या कामांमुळे जंगली महाराज आणि फर्ग्युसन रस्त्यावरही बॅरिकेडिंगमुळे पाणी तुंबून संपूर्ण रस्ता पाण्यात बुडाला. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर जणू नदी दुथडी भरून वाहत होती. मध्य शहरातील अशी दाणादाण उडाली असताना कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, औंध, सिंहगड रस्ता, वारजे, आंबेगाव भागात वाहने बुडाली, वाहून गेली. पार्किंगमध्ये पाणी घुसले. या पावसाने शहर जणू बंद पडले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून स्मार्ट सिटीचा फुगा फुटला आहे.
12 जणांची सुटका
कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबकेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात आणि पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी सात नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. मंगळकार पेठेतील स्वरूपवर्धिनीजवळ मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटुंबातील 5 जण पाण्यात अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली.
सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले आहे, अनेकांच्या गाडय़ा वाहून गेल्या आहेत असे असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहर तुंबण्याचे खापर पावसाकर फोडले आहे. शहरात 60 ते 65 मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेण्याची पावसाळी गटारांची क्षमता आहे; पण अडीच तासांत 105 मि.मी. पाऊस पडल्याने ही स्थिती झाल्याचे ते म्हणाले.
शहरात यापूर्वी 2010 मध्ये एका दिवसांत 180 मि.मी. पाऊस पडला होता. तर ऑक्टोबर महिन्यांत यापूर्वी 440 मि.मी. 316 मि.मी. पाकसाचे सर्वोच्च रेकॉर्ड आहे. ऑक्टोबर महिन्याचे अद्याप दोन आठकडे बाकी आहेत. तेंव्हापासून केवळ दोन तासांत 105 मि.मी. पाऊस पडण्याची पहिलीच वेळ असून हा आतापर्यंचा रेकॉर्डब्रेक पाऊस ठरला आहे.
नागरिकांना तत्काळ मदत करण्याची शिवसेनेची मागणी
पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात, व्यावसायिकांच्या दुकानांत गेल्याने नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांची दिवाळी खराब झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागाची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई म्हणून मदत करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे.
किती पाऊस पडावा हे पालिका ठरवत नाही
शिवसेनेच्या अधिपत्याखालील मुंबई पालिकेच्या नावाने एरव्ही शिमगा करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधकांना पुण्यात काल झालेल्या अतिवृष्टीवर उत्तरे देता देता पळता भुई थोडी झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुण्यात किती पाऊस पडावा हे पुणे महापालिका ठरवत नाही, असे वक्तव्य करत आज बचावात्मक पवित्रा घेतला. पुण्याची ड्रेनेज डिझाईन चाळीस वर्षांपूर्वीची आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपची महापालिकेत सत्ता आली आहे असे सांगत फडणवीसांनी वेळ मारून नेली.
































































