
सामना प्रतिनिधी। कर्जत
पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. यामुळे इथला निसर्ग अधिकच खुलला असून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. शनिवारी रात्री पासूनच माथेरान मध्ये अतिवृष्टीला सुरुवात झाली. नगरपालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी ६ वाजे पर्यंत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .दरम्यान अतिवृष्टीमुळे काही काळ इथला वीज पुरवठा खंडीत होता.
२०१७ मध्ये १५ जुलै पर्यंत १५८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर १४ जुलै २०१८ पर्यंत २४७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी माथेरान मध्ये ८८८ मिलिमीटर पाऊस जास्त झाला आहे.रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद माथेरान मध्ये झाली आहे. तसेच पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसातही मिनिट्रेनची शटल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.




























































