नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आयुक्तांचे आवाहन, अलर्ट जारी

नाशिक येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्तांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे.

शहरात देखील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी जमा झाल्याचे पाहायला मिळत होते. गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असून पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून नऊ वाजता 2000 क्युसेक तर दहा वाजता अडीच हजार क्युसेक विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.