पावसाचा रुद्रावतार; कळव्यात दरड कोसळून 5 ठार, रायगडात 5 जणांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगडमधील अंबा, कुंडलिका, बाळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाली-वाकण मार्गावरील वाहतूक बंद झाली. पेण तालुक्यात बाळगंगा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला होता.

राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कल्याणसह काही स्थानकांवर रेल्वे ट्रकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक काsंडी झाली होती. अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपून काढले आहे. कळव्यातील घोलईनगर आणि माथेरानमध्ये दरडी कोसळल्याच्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक अडकून पडले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांत भयंकर पाऊस होत आहे. अनेक गावे आणि वाडय़ांचा संपर्क तुटला आहे. कोकण रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने पहाटेपासून अनेक गाडय़ा खोळंबून पडल्या. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील सोलापूर, लातूर, धाराशीव, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, परभणीतही मध्यम ते मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी डोंगर खचल्याच्याही घटना घडल्या.

कांदिवलीत 400 गाडय़ा पाण्याखाली

पावसामुळे कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समधील महानगरपालिकाच्या पार्किंगमध्ये 400 पेक्षा जास्त गाडय़ा उभ्या करण्यात आल्या होत्या. या सर्व गाडय़ा पाण्याखाली गेल्या.