नगर – हेलिकॉप्टरमुळे माझे तिकीट कापले गेले – सुजय विखे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe patil

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हेलिकॉप्टरने फिरत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र, याच हेलिकॉप्टरमुळे माझे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचे तिकीटच कापले गेले होते, असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी भर सभेत केले.

2017 मध्ये झालेल्या नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगर जिह्याच्या राजकारणात विखेंचा हवाई प्रचार चांगलाच गाजला होता. त्यातच आज वाळकी येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने विखेंसमोरच त्यांच्या हेलिकॉप्टर प्रचाराची आठवण करून दिली. हा धागा पकडत विखे यांनी आपल्या भाषणात हेलिकॉप्टर प्रवासामुळे झालेला फायदा व तोटय़ाचा किस्साच सांगितला.

विखे म्हणाले, ‘आता मी भाजपचा खासदार आहे. आपले हेलिकॉप्टर तेव्हाही होते व भविष्यातही फिरत राहणार. त्यावेळी हेलिकॉप्टरमुळे माझे तिकीटही कापले गेले होते. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो व राष्ट्रवादीशी आघाडी होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विचारले होते की, तू आताच हेलिकॉप्टरमध्ये फिरतोस. निवडून कसा येणार?’, असे विचारल्याचेही खासदार विखे यांनी सांगितले.