
>> विक्रम गायकवाड
डॉ. प्रकाश आमटेंचे सर्वसमावेशक मोठ्ठे कुटुंब. हेमलकसाचे सारे आदिवासी जसे या कुटुंबातील सदस्य तसेच तेथील साऱया वन्य प्राण्यांसाठीही हे हक्काचे घर…
2012 च्या सप्टेंबर महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी आली की, डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर एक चित्रपट बनणार आहे आणि त्यांत डॉक्टरांची भूमिका नाना पाटेकर करत आहेत. ती बातमी वाचली आणि छातीची धडधड वाढली. कारण बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे यांच्यावर लिहिलेली आणि यांनी लिहिलेली जवळपास सगळीच पुस्तकं मी वाचली होती. त्यात विशेष करून डॉ. प्रकाश आमटेंच्या मनातला खूप मोठा कप्पा प्राण्यांसाठी राखीव आहे, हे मला माहीत होतं.
त्यांच्या एकूणच कार्याचा मी खूप वर्षांपासून चाहता होतो. त्यांना एकदा तरी भेटायची इच्छा होती. काय करावं कळेना…एका मित्राकडून नाना पाटेकरांचा नंबर मिळवला. जवळपास दोन तास त्या नंबरकडे नुसता बघत बसलो होतो. भीती वाटत होती की, काहीच ओळख नसताना कसं म्हणायचं की, मला पण तुमच्या चित्रपटात घ्या…पण प्रकाश आमटेंना भेटायची इच्छा ही भीतीपेक्षा प्रबळ होती. घाबरत घाबरत नानांना मेसेज केला की, मला तुमच्या चित्रपटात छोटय़ात छोटा का होईना पण रोल हवा आहे आणि दुसऱयाच क्षणी माझा फोन वाजला. डिसप्लेवर नाव आलं ‘नाना पाटेकर’. मी थरथरतच फोन उचलला. मी म्हटलं, आता पडणार शिव्या… पण तेवढय़ात तिकडून आवाज आला – बाबू, खूप छान काम करतोस रे. मी तुझी ‘उंच माझा झोका’ मालिका रोज बघतो. तू माझ्या चित्रपटात ‘विलास मनोहरां’ची भूमिका करतोएस. मला काय करावं सुचेना. मेकअप रूमची कडी लावली आणि एकटाच खूप वेळ नाचलो.
डिसेंबर 2012 ला चित्रीकरण सुरू झालं आणि ‘लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा’ असं लिहीलेल्या गेटवर पोहोचलो. तिथला दरवळ आज सात-आठ वर्षांनंतरही तसाच ताजा आहे. इतके दिवस ज्या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आला. डॉ. प्रकाश आमटे भेटले. इतका नम्र मनुष्यप्राणी मी अजूनतरी पाहिला नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिथे काम करणाऱ्या एकाही दोन पायाच्या प्राण्याला आपण निसर्गापेक्षा मोठे आहोत, असं चुकूनही वाटत नाही.
मला प्राण्यांची आवड आहे, हे समजल्यावर ते मला रोज सकाळी त्यांच्या ‘आमटेज् ऑनिमल आर्क’मध्ये घेऊन जाऊ लागले. त्यांच्याकडच्या प्राण्यांइतके निरोगी आणि डोळ्यांत राग नसलेले पिंजऱयातले प्राणी मी आजवर कुठल्याच प्राणीसंग्रहालयात पाहिलेले नाहीत. याचं मुख्य कारण – ते प्राणीसंग्रहालय नाही तर त्या प्राण्यांचं अनाथालय आहे. त्यांच्यासाठी तेच त्यांचं घर आहे. सर्वस्व आहे. आणि तिथेच मला ‘रंगू’ भेटला. रंगू हा 17 वर्षांचा बिबटय़ा होता. मला त्याच्याबरोबर एक प्रसंग चित्रित करायचा होता. त्याला हात लावायचा होता. त्याचा भांग पाडायचा होता. मी आजपर्यंत ‘साप’ सोडून कुठल्याच वन्य प्राण्याला हात लावला नव्हता. आता एकदम ‘बिबटय़ाचा’ भांग पाडायचा होता. किंचित भीती होती. सकाळी-सकाळी पिंजऱयात शिरलो. पिंजऱयात फक्त मी आणि रंगू आणि पिंजऱयाच्या दरवाज्यात कॅमेरामन आणि कॅमेरामनच्या मागे प्रकाश आमटे उभे. मला आमटेंनी सांगितलं, घाबरत घाबरत हात लावू नकोस. बिंधास्त हात लाव. त्याला कळतं. खरंच सांगतो, त्याला केलेला पहिला स्पर्श आजही आठवतो. एका हिंस्त्र श्वापदाचं शरीर इतकं मऊ असेल आणि त्याच्या डोळ्यात इतके प्रेमळ भाव असतील, याची मी स्वप्नांतसुद्धा कल्पना केली नव्हती. रंगू तिथल्या सगळ्या प्राण्यांमधला सगळ्यांत प्रौढ सदस्य असल्यामुळे खूपच समजूतदार होता. त्याने मला खूप छान सांभाळून घेतलं. प्राण्यांमध्येही ‘अतिथी देवो भव’ असतं, हे मला तेव्हाच कळलं. त्याच्या मनात आलं असतं तर त्याच्या एका नखानेच त्याने मला आडवं केलं असतं. पण त्याने तसं केलं नाही कारण त्याच्यावर आमटेंचे संस्कार होते. आज ‘रंगू’ या जगात नाही. पण चित्रपट बघताना त्याच्याबरोबरचा प्रसंग पाहिला की, त्याचा स्पर्श हातावर जाणवतो आणि वाटतं, पुन्हा लोकबिरादरी प्रकल्पाला जाण्याचा योग आला तर त्याच्या पिंजऱयात त्याची पुढची पिढी तितक्याच रुबाबात बसली असेल आणि मला बघून म्हणेल – अरे तूच माझ्या बाबांबरोबर पिक्चरमध्ये काम केलं होतंस ना?






























































