
‘झिम्मा’ने एका वर्षापूर्वी बॉक्स ऍाफिसवर चांगली कामगिरी केली. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला. त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा 2’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. या घोषणेचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यू फिल्म्सनिर्मित हा चित्रपट येत्या दसऱयाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘झिम्मा 2’बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ‘झिम्मा’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकटय़ा घराबाहेर न राहिलेल्या महिला त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे बेत आखतात. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा 2’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळय़ा मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा 2’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा 2’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून प्रेक्षकांना आवडेल.
























































