घुसखोरी-तस्करीच्या विळख्यात सुंदरबन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन 

पश्चिम बंगालची सागरी सुरक्षा अत्यंत ढिसाळ आहे आणि देशाच्या सुरक्षेला एक मोठा धोका आहे. आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने पश्चिम बंगाल किनारपट्टीकरता एक नवीन बटालियन तैनात करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. घुसखोरी, तस्करीपासून सुंदरबन सुरक्षित करण्यासाठी आखलेल्या योजनेचा भाग आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा आराखडा तयार केला जाईल. झोपी गेलेली सुरक्षा दले आता जागी झालेली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला लगेच मंजुरी देऊन पश्चिम बंगालची किनारपट्टी सुरक्षित करावी.

गेले तीन आठवडे मी पश्चिम बंगाल किनारपट्टीचा दौरा केला आणि तिथे असलेल्या सुरक्षा दलाच्या अनेक कर्मचाऱयांशी बोललो. यामध्ये पश्चिम बंगाल किनारपट्टीला असलेले अनेक धोके समोर आले. त्याचे मी या लेखामध्ये विश्लेषण केले आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर शस्त्रास्त्रांची, दारूगोळय़ाची तस्करी, घुसखोरी आणि इतर गुन्हेगारीमुळे किनाऱयालगतचे महत्त्वाचे उद्योग वा संरक्षण आस्थापनांना सीमापारच्या अवैध हालचालींपासूनचा धोका आहे. पूर्व मिदनापूर, दक्षिण 24-परगणा आणि उत्तर 24-परगणा, शेजारी देशास नद्यांनी व बंगालच्या उपसागराने जोडल्या गेलेल्या तीन जिह्यांना मिळून 156 कि.मी.हून अधिक किनारपट्टी लाभलेली आहे. ती केवळ सात पोलीस स्थानकांना सांभाळायची आहे. ती कुठलीही आणीबाणी हाताळण्यास समर्थ नाहीत.

पश्चिम बंगालमधील किनारपट्टीत बांगलादेशलगतचा सुंदरबन भागही समाविष्ट आहे. तेथील सागरी सुरक्षा सांभाळण्यात समोर आलेल्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत. भारत आणि बांगलादेशदरम्यान 180 कि.मी. सीमा पश्चिम बंगालमधील नदीचीच आहे. सागरी सुरक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात; दिघा मोहना, तलपटीघाट, हल्दिबारी (सुंदरबन), मैपीठ, फ्रेझरगंज आणि हेमनगर ही सहा पोलीस स्थानके उभी राहिली. दुसऱया टप्प्यात आणखी आठ पोलीस स्थानके जुनपुट, मंदारमोनी, नयाचार, गंगासागर, गोबर्धनपूर, झार्कली, हार्वूड पॉइंट आणि डायमंड हार्बर आता पूर्ण झाली आहे.

105 कि.मी. किनारपट्टीच्या सुरक्षेकरिता, पश्चिम बंगालने 13 निगराणी जलदगती नौका खरेदी केलेल्या आहेत. राज्यात निरनिराळी सात पोलीस स्थानके आहेत. मात्र हे राज्य जमिनीवरून आणि समुद्रमार्गे आलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. आसाम अवैध बांगलादेशींना, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदपुस्तकाच्या आधारे हुडकून काढण्यात व्यग्र असतानाच पश्चिम बंगाल मतपेटीच्या राजकारणामुळे या समस्येबाबत स्वस्थ आहे.

असंख्य खाडय़ा, छोटी आखाते, छोटय़ा नद्या ही पश्चिम बंगालची वैशिष्टय़े आहेत. खाडय़ांच्या सुरक्षा आणि देखरेखीकरता सीमा सुरक्षा दलाच्या जलशाखेची 1 बटालिअन, सहा तरत्या सीमाचौक्यांसह (बी.ओ.पी.-बॉर्डर आऊट पोस्टस्) तैनात केलेल्या आहेत. यांपैकी चार आघाडीवर तैनात आहेत, तर दोन आरक्षित ठेवलेल्या आहेत. या सीमाचौकी गस्तीनौकांच्या मदतीने संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवतात. जी साधने अपुरी आहे. सर्व खाडय़ा लहान नाल्यांनी जोडलेल्या असतात. उथळ आणि खोल खाडय़ा चक्रव्यूह घडवतात. अशा मार्गांचा वापर करून घुसखोर, तस्कर आणि दहशतवादी भारतीय सीमेच्या आत-बाहेर, ये-जा करतात. ओहोटीच्या काळात तयार होणारी बेटे आणि वालुकादंड यांवरील खारफूट त्यांना आसरा देते. अनेक बांगलादेशी घुसखोर शस्त्रास्त्रs, दारूगोळा आणि स्फोटके घेऊन येताना भारतीय सुरक्षा दलांकडून या भागांत पकडले गेले आहेत. 11 नोव्हेंबर 2015 रोजी दोन बांगलादेशी नौका, भारतीय पाण्यातील सुंदरबनात शिरल्या. ज्यामुळे कोलकात्यात ‘26/11’सारखा हल्ला होईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. गस्त घालणाऱया कोस्ट गार्ड नौकेने, बांगलादेशाच्या बंगदुनी बेटापासून काही अंतरावर त्या नौका पकडल्या.

सुंदरबनातील जलमार्गांचे जाळे अतिशय धोकादायक आहे, राष्ट्रविरोधी कार्यवाहीस अनुकूल आहे. त्यांतून दहशतवादी आणि शस्त्रास्त्रs सहजपणे देशाच्या मुख्य भूमीतील इतर भागांत घुसखोरी करू शकतात. सुरक्षा दलांनी, भारत-बांगलादेश भूमीअंतर्गत जलमार्ग आणि व्यापाराबाबतच्या संकेत-संचानुसार सुंदरबनातून येण्याऱया बांगलादेशी तराफ्यांवर अधिक देखरेख करणे आवश्यक आहे. बोटींना तपासणी न करता सुंदरबनातून पार जाऊ दिले जाऊ नये. कारण त्यामुळे, दोन्ही शेजारी देशांतील मैत्रीचा, सुरक्षा दलांना चकवण्यासाठी गुन्हेगार गैरफायदा घेण्याचा धोका असतो.

भारताचे किनारे भूसंरचनेच्या वैविध्याने नटलेले आहेत, जसे की खाडय़ा, छोटी आखाते, पाणवठे, छोटय़ा नद्या, उथळ तलाव, नदीमुखे, दलदली, खारजमिनी, तसेच टेकडय़ा, खडकाळ कडे, दांडे, किनारे आणि बेटे (लोकवस्ती असलेली आणि नसलेली). दुर्गम असल्याने सुंदरबन हा भाग असुरक्षित आहे. अपुऱया सुरक्षेमुळे अशी ठिकाणे, छुप्या रीतीने अवैध शस्त्रास्त्रs, स्फोटके आणि तस्करीकृत सामान उतरवून घेण्याकरता, तसेच तस्कर व दहशतवाद्यांच्या घुसखोरीकरता आदर्श ठरली आहेत. अवैध नौका सहजच इथे दाखल होऊ शकतात आणि गुपचूप नाहीशादेखील होऊ शकतात. त्यांना भू-संरचनेच्या वैशिष्टय़ांचा लाभ घेता येतो. कडक सुरक्षा आणि वारंवार जलमार्गांवरील सुरक्षाविषयक तालमी, कवायती होत असूनही घुसखोर बांगलादेशीचा ओघ कमी झालेला नाही. सार्वजनिक सुरक्षेस यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे .
पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशींची संख्या सर्वाधिक 57 लाख असल्याचा अंदाज आहे. काही बांगलादेशी स्थलांतरित खोटय़ा नोटांचा प्रसार करत असताना पकडलेले होते. बांगलादेशी घुसखोर, मतपेटीच्या राजकारणापोटी; पारादीप, कुजांग आणि इर्सामा भागांमध्ये राजकीय आश्रयाने स्थायिक झालेले आहेत. त्यांचे अवैधरीत्या राहणे कायदेशीर केले गेलेले आहे. घुसखोरांना शिधावाटपपत्रे प्राप्त झालेली आहेत, मतदारपत्रे मिळालेली आहेत किंवा गरिबीरेषेखालील असल्याबाबतचे प्रमाणपत्रही लाभलेले आहे. त्यांच्या आधारे ते सरकारी लाभ उपभोगत आहेत.