हेरिटेज महाराष्ट्र

नमिता वारणकर,[email protected]

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहरिन मनामा येथे झालेल्या ४२ व्या  परिषदेत देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान महाराष्ट्र राज्याला देण्यात आला आहे.

भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधतेचा मिलाफ जेथे आढळतो ते महाराष्ट्र राज्य… ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’… या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेल्या महाराष्ट्र गौरव गीताची प्रचिती युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहरिन मनामा येथे झालेल्या ४२ व्या परिषदेत आली. या परिषदेत देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान महाराष्ट्र राज्याला देण्यात आला आहे.

यापूर्वी अजिंठा, एलिफंटा, वेरुळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत इत्यादी स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला होता. यंदाच्या परिषदेत मुंबईतील व्यावसायिक आणि उच्चभ्रू समजला जाणाऱया दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह आणि फोर्ट परिसरात असलेल्या  १९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वास्तू शैलींच्या इमारती आणि 2 २० व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारतींचा समावेशही जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, उच्च न्यायालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलिस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तूशैलीच्या इमारती, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेशनची पहिली रांग, दिनशॉ वच्छा रोडवरील राम महल, इरॉस, रिगल सिनेमा आदी ब्रिटीशकालीन वास्तूंचा अमूल्य ठेवाही यामध्ये जपला आहे.

घारापुरी लेणी 

घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी एका बेटावर खोदलेल्या आहेत. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. यामध्ये शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासूर वध अशी दृष्ये अतिशय रमणीय आहेत.

‘युनेस्को’कडून अनुदान

‘जागतिक वारसा स्थानां’ची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर असते. वास्तू, उद्यान, जंगल, सरोवर असे जगातील सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्टय़ा प्रतिष्ठा असलेल्या एखाद्या स्थानाला युनेस्कोकडून मान्यता दिली जाते किंवा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.

अजिंठा लेणी

संभाजीनगर शहरापासून जवळपास ९० किमी अंतरावर अजिंठा लेणी आहेत. बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांची लेणी या ठिकाणी आहेत. बौद्ध जातक कथेवरील चित्रे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक अजिंठय़ाला येतात.

वेरूळ लेण़ी

संभाजीनगर शहरापासून ३० कि.मी. अंतरावरील वेरुळ गावातील ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या ३४ लेणी येथे पाहायला मिळतात. केंद्र सरकारने  या लेणीला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित केले आहे.

कासचे पठार

सातारा जिह्यातील हे निसर्गरम्य ठिकाण असून ते रंगीबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथे 2२८० फुलांच्या प्रजाती, वनस्पती, वेली, झुडुपे अशा ८५० प्रजाती आढळतात. तसेच ५९ जातींचे सरपटणारे प्राणी आढळतात. त्यामळे याला ‘जैव–विविधतेचा हॉटस्पॉट’ म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस़

मुंबईचे सर्वात मोठे व शेवटचे रेल्वे स्थानक. ब्रिटिश स्थापत्य व गॉथिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या वास्तूला महत्त्वाचे स्थान आहे.

अशी होते निवड…

सध्या जगभरातील १५३ देशांमध्ये एकूण ९३६ वारसा स्थाने अस्तित्वात आहेत. त्यापैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक स्थळे आणि २८ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक ४७ तर हिंदुस्थानमध्ये २८ जागतिक वारसा स्थाने आहेत. स्थळांचं महत्त्व, सांस्कृतिक, कलात्मक वैशिष्टय़, , ऐतिहासिक वैभव या दृष्टिकोनातून ही निवड केली जाते. युनेस्कोने १९७८ साली वारसा स्थळे जाहीर करण्यास सुरुवात केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या