
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उखडलेल्या महामार्गाची डागडुजी करण्याच्या कामाला ठेकेदार कंपनीने अखेर सुरवात केली आहे. खड्ड्यात गेलेल्या महामार्गावरून प्रवाश्याना आदळत आपटत प्रवास करावा लागत होता मात्र आता महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली असल्याने चालकांसह प्रवाश्यानाही दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात दरवर्षी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट व चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील रस्ता अक्षरशा वाहून जातो. पाऊस गेल्यावर उखडलेल्या रस्त्याची डागडुजी केली जाते आणि माहामार्ग वाहतुकीस योग्य होतो. मात्र या वर्षीची परिस्थिती थोडी वेगळी होती. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भरणे नाका , खोपी फाटा, भोस्ते घाट आणि परशुराम घाट या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला होता. वाहून गेलेल्या रस्त्यावरून वाहने हाकताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होऊ लागले होते. खड्ड्यात आदळून वाहने नादुरुस्त होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर चालक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी होती. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारी कल्याण टोलवेज हि कंपनी हेतुपुरस्सर खड्डे भरण्यास विलंब करत असल्याचा आरोप केला जात होता.
या बाबत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता डांबर उपलब्ध नसल्याने खड्डे भरण्यास विलंब होत होता. मात्र आता डांबर उपलब्ध होताच खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे असे स्पष्ट करण्यात आले. खेड तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या अर्ध्या परशुराम घाटापासून खड्डे भरण्यास सुरवात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात भरणे, खोपी फाटा आणि भोस्ते घाट येथे खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यात गेलेला महामार्ग पूर्ववत होणार आहे.




























































