
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
जागतिक जुनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत मी ४०० मीटर्स दौडीत पटकावलेले ऐतिहासिक सुवर्णपदक माझ्यासाठी परिकथेतील गोड स्वप्नासारखेच आहे. या यशाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत, अशी आनंदी प्रतिक्रिया फिनलँडच्या अंडर -२० जागतिक स्पर्धेत महिला गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिंदुस्थानच्या हिमा दासने व्यक्त केली आहे. महिला फुटबॉलपटू ते आंतरराष्ट्रीय धावपटू असा प्रवास करणारी आसामची १८ वर्षीय हिमा जागतिक अॅथलेटिक्समध्ये सुवर्णकामगिरी नोंदवणारी पहिली हिंदुस्थानी धावपटू ठरली आहे. या सोनेरी यशाबद्दल देशभरातून हिमावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हिमाने फिनलँडमधील अंडर -२० जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर्स दौडीत सुवर्णपदक पटकावत हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्राचे नाव उज्वल केले.जागतिक ट्रॅक प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली हिंदुस्थानी ऍथलिट म्हणून हिमाच्या नावाची नोंद झाली आहे. आपल्या नेत्रदीपक यशानंतर देशवासियांना उद्देशून हिमा म्हणाली ,माझ्या प्रिय देशवासियांनो मला सांगायला अतिशय आनंद होतोय कि तुम्ही गाढ झोपेत असताना मी जागतिक युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले . माझा हा पराक्रम मला परिकथेतील स्वप्नाची पूर्ती झाल्यासारखाच वाटतोय.तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावरच मला हे यश लाभलेय.या पराक्रमानंतर हिंदुस्थानी राष्ट्रध्वज अंगाभोवती लपेटून मैदानात फेरी मारताना चक्क स्वर्गातच असल्याचा भास मला झाला. हिंदुस्थानचे जागतिक अॅथलेटिक्समधले पहिले सुवर्णपदक माझ्या नावावर असावे याचा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही.यापुढेही देशासाठी असेच उज्वल यश मिळविण्याची जिद्द मी मनात बाळगली आहे.
हिंदुस्थानच्या पोस्टर गर्लवर अभिनंदनाचा वर्षाव
जागतिक अॅथलेटिक्समधील ऐतिहासिक यशानंतर आसामच्या धिंग गावातून आलेल्या हिमावर देशभरातून अभिनंदनाचा तुफान वर्षाव होतो आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर हिमाने सुवर्णपदक पटकावल्यावर लगेच देशाचा तिरंगा शोधायला सुरुवात केली. हिमाच्या या देशभक्तीने मला भरून आलेय. आमची हि पराक्रमी कन्या सातासमुद्रापार जाऊन पराक्रम करते आणि तिथेही आपल्या यशापेक्षा देशप्रेमाला प्राधान्य देते हि गोस्ट मनाला फारच भावली ,असे ट्विट करीत पंतप्रधानांनी हिमाचे अभिनंदन केले आहे. हिमा,तिचे पालक ,प्रशिक्षक या सर्वांचे माझ्यावतीने अभिनंदन. पंतप्रधानांसोबत केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड ,बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ,सचिन तेंडुलकर ,व्हीव्हीएस लक्ष्मण आणि माजी धावपटू पि टी उषा यांनीही ट्विट करीत विक्रमी हिमाचे अभिनंदन केले आहे.
अवघ्या दोन गुंठेवाल्या शेतकऱ्याच्या कन्येचा पराक्रम
आसामच्या छोट्याश्या धिंग गावात अवघ्या दोन गुंठे जमिनीत शेती करून सहा जणांच्या कुटुंबाची गुजराण करणारे ५२ वर्षीय रणजित दास यांची हिमा हि कन्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुलीला मुलासारखे वाढवून रणजित यांनी हिमाच्या क्रीडा कौशल्याला वाव दिला. प्रथम महिला फुटबॉलमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या हिमाने नंतर अॅथलेटिक्सकडे वळत नवी विक्रमी कामगिरी साकारत देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात मोठे केले आहे.
“धिंग एक्सप्रेस”ने दारूचे अड्डेही तोडले होते
हिमा दास ही केवळ खेळातच नव्हे तर समाजसेवेतही नेहमीच पुढे असते. धिंग एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाने दारूबंदी व्हावी यासाठी केलेल्या आंदोलनात गावातील दारूची दुकाने आणि अड्डेही फोडण्यात पुढाकार घेतला आहे. समाजविघातक गोष्टीविरुद्ध आवाज उठवण्यास हिमा कधीही कचरत नाही. केंद्र सरकारने हिमाच्या विक्रमी कामगिरीबद्दल तिला २०२० च्या टोकियो ऑलीम्पिकपर्यंत टॉप्स योजनेच्या अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.


























































