क्रॉस व्होटिंग करणारे 6 आमदार अपात्र; हिमाचल काँग्रेसमधील सर्व मतभेद दूर, ऑपरेशन लोटस फेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱया 6 आमदारांना अपात्र ठरवले आहे. पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. हिमाचलच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे आमदारांवर कारवाई करण्यात आली असून पह्डापह्डीचे राजकारण करून काँग्रेसची सत्ता उलथवण्याचा भाजपचा डाव धुळीस मिळाला. काँग्रेसमधील सर्व मतभेद दूर झाले असून ऑपरेशन लोटस फेल गेल्याचे काँग्रेसचे पेंद्रीय निरीक्षक डी.के. शिवकुमार यांनी सांगितले. तसेच सुख्खू सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे उमेदवार अभिषेक सिंघवी यांच्या राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांनी घेतल्याचेही डी.के. शिवकुमार यांनी सांगितले. आमदार विक्रमादित्य सिंग आणि प्रतिभा सिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. भाजपा आयाराम गयारामचे राजकारण करत आहे, असा आरोप शिवकुमार यांनी केला. हिमाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राजीव शुक्ल, पक्षाचे पेंद्रीय निरीक्षक भुपेंद्र सिंग हुडा आणि प्रतिभा सिंग हेदेखील बैठकीला उपस्थित होते. सर्व आमदारांशी चर्चा करण्यात आली असून आमच्यात आता कुठलेही मतभेद राहिले नाहीत, असे शिवकुमार म्हणाले.

लोकसभा निवडणूक एकजुटीने लढणार

सर्व आमदारांशी चर्चेनंतर मतभेद मिटले आहेत. लोकसभा निवडणूक आम्ही एकदिलाने लढणार आहोत, असे भुपेंद्र सिंग हुडा यांनी सांगितले. एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून कोणताही आमदार बैठकीतील माहिती घेऊन प्रेससमोर जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

सरकार पाडण्याचा डाव

राज्यसभा निवडणुकीनंतर सरकार पाडण्याचा भाजपचा डाव होता. त्यामुळे आम्ही अर्थसंकल्प मंजूर करून घेतला असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी सांगितले. आमच्या आमदारांचे संख्याबळ घटावे यासाठी माझ्या राजीनाम्याच्या बातम्या पेरल्या गेल्या, असा आरोपही त्यांनी केला. मतदानादरम्यान विरोधकांनी मार्शलचा गळा पकडला, असेही त्यांनी सांगितले.

अपात्र आमदार सुप्रीम कोर्टात

हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी आज गुरुवारी क्रॉस व्होटिंग करणाऱया सहा आमदारांना अपात्र ठरवले. पठानिया यांच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे अपात्र आमदारांपैकी एकाने सांगितले. सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजिंदर राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देविंदर कुमार भुत्तो या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे.