दुष्काळ अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

24

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मदतीचा दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तसेच दुष्काळी अनुदानाची पहिल्या हप्त्याची रक्कमही बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उपोषणस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

हिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील विजय चौधरी, बालाजी चौधरी, बबन कांबळे, शिवाजी चौधरी, विश्वनाथ चौधरी, संभाजी चौधरी, नामदेव मोरे, संजय कांबळे, राम मल्हारी, रामचंद्र सुर्यभान, केदारलिंग शिंदे यांच्यासह शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिरसम येथील कर्मचाऱ्यांनी दुष्काळ अनुदानाचा पहिला हप्ता मंजुर झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यासोबतच दुसरा हप्ता देखील मंजुर करुन बँक खात्यावर जमा करण्यात यावा, असेही निवेदनात म्हंटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भर पावसात शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, ही माहिती समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी तात्काळ उपोषण स्थळी भेट दिली. उपोषणकत्र्या शेतकऱ्यांकडुन त्यांची अडचण समजुन घेऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बांगर यांनी चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने अनुदानाचे दोन्ही हप्ते द्यावेत, अशी मागणी केली.

…तर शिवसेना रस्त्यावर उतरेल – जिल्हाप्रमुख संतोष बांगर
हिंगोली जिल्ह्यामध्ये विशेष करुन कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडुन येत आहेत. यासोबतच पीककर्ज वाटपातही बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुष्काळी अनुदानाच्या रक्कमेसोबतच पीककर्ज वाटपाची गती वाढवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या