
हिंजवडी ग्रामपंचायतीअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील सेविका आणि मदतनीस अंगणवाडीतील चिमुकल्यांना कोंडून ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीस गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंडल्यामुळे घाबरलेल्या चिमुकल्यांनी रडायला सुरुवात केली. त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा हा प्रताप समोर आला. बुधवारी हिंजवडातील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये हा प्रकार घडला.
हिंजवडी येथे म्हातोबा टेकडीजवळ अंगणवाडी केंद्र क्रमांक तीन असून या अंगणवाडीत एकूण 20 विद्यार्थी आहेत. सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या अंगणवाडीत कार्यरत आहेत. हिंजवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, सदस्य शिवनाथ जांभुळकर यांनी बुधवारी हिंजवडी ग्रामपंचायत अंतर्गत सहा अंगणवाडी केंद्राच्या सेविका व मदतनीस यांना ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीसाठी बोलवले होते. या बैठकीसाठी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या दोघीही गेल्या. मात्र, जाताना साखरे यांनी अंगणवाडीच्या सेफ्टी दरवाजाला कुलूप लावले आणि 15 विद्यार्थ्यांना कोंडून ठेवले. हिंजवडी क्रमांक 3 येथील अंगणवाडीत उपस्थित तीन पालकांना बालकांकडे लक्ष ठेवण्यास सांगून सेफ्टी दरवाजास कुलूप लावून या दोघी बैठकीसाठी गेल्या होत्या. अंगणवाडी केंद्र आणि कार्यालय हे अंतर केवळ 100 मीटर अंतरावर आहे.
तरीही बराच वेळ होऊनही शिक्षक वर्गात न आल्याने चिमुकल्यांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावलेले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते.


























































