हिराकोट किल्ला आणि तलावाला मिळणार पर्यटन दर्जा

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अलिबाग येथील हिराकोट किल्ल्याचा सध्या जिल्हा मध्यवर्ती कारागृह म्हणून वापर केला जातो आहे. हे कारागृह किल्ल्यातून स्थलांतरीत करून आणि किल्ला बांधताना लागलेला दगड वापरण्यात आलेल्या हिराकोट तलावाला पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, किल्ल्यात सुसज्ज वास्तू संग्रहालयाची उभारणी केली जावी अशी मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. पर्यटन विभागाने सांस्कृतीक कार्य विभागाला यासंदर्भात कार्यवाही करण्याची सुचना केली आहे.

सन 1720 च्या कालखंडात अलिबाग येथे हिराकोट किल्ल्याची उभारणी करण्यात आली. तत्कालिन अष्टागारातील महसुल यंत्रणेचे मुख्यालय म्हणून हा किल्ला ओळखला जायचा. कुलाबा, खांदेरी उंदेरी आणि सागरगड या किल्ल्यांवरील यंत्रणामध्ये समन्वय राखण्याचे जबाबदारी याच किल्ल्यातून पार पाडली जात असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व मोठं आहे. कोकण किनारपट्टीवर आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या किल्ल्यामध्ये हिराकोट किल्ल्याचा समावेश आहे. मात्र संध्या या ऐतिहासिक किल्ल्याचा वापर जिल्हा मध्यवर्ती कारागृह म्हणून केला जात आहे.

हिराकोट किल्ला बांधण्यासाठी समोर असलेल्या कातळ काढून त्याचे दगड हे किल्यासाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे कातळ काढल्यानंतर त्याठिकाणी तलाव बांधण्यात आले आहे. या तलावाला हिराकोट तलाव म्हणून ओळखले जाते. अलिबाग नगरपालिकेने या तलावाचे सुशोभीकरण केले आहे. कान्होजी आंग्रे काळातील असलेल्या या हिराकोट तलावही ऐतिहासिक दर्जा असून त्यालाही पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

ऐतिहासिक हिराकोट किल्ल्यातून जिल्हा कारागृह तातडीने हटवावे, ही वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषीत व्हावी आणि किल्ल्यात जिल्हा वास्तू संग्रहालयाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी इतिहास प्रेमी आणि संशोधकांकडून सातत्याने केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन आता स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना या किल्ल्यातील कारागृह हटवून तिथे सुसज्ज वास्तुसंग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कारागृह स्थलांतरीत करण्याच्या दृष्टीने तसेच वास्तुसंग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने सांस्कृतीक कार्य विभागाला योग्यती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कारागृह कैद्यासाठी अपुरे

या कारागृहात एकावेळी 80 कैंदी ठेवता येऊ शकतात. मात्र सध्या जवळपास दोनशे कैदी या ठिकाणी ठेवले जातात. अतिशय अपुऱ्या जागेत कैद्यांना रहावे लागते. त्यामुळे हे कारागृह नविन जागेत स्थलांतरीत करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने कारागृहाच्य नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही.

“हिराकोट तलावातील कारागृह हटवावे, आणि तिथे पुरातत्वीय वास्तू संग्रहालयाची उभारणी व्हावी. तसेच हिराकोट तलावाचा ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा अशी मागणी मी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे कडे केली होती. त्यांनी सांस्कृतीक कार्यविभागाला यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.” – महेंद्र दळवी, आमदार

“कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा, खांदेरी किल्ल्याच्या दृष्टीने देखरेख आणि संकटकाळात शत्रूवर हल्ला करण्यासाठी छुप्या पद्धतीने हिराकोट किल्ल्यात सैन्य तैनात करण्यात आले होते. अष्टगराचा महसूल हा हिराकोट किल्ल्यात ठेवला जात होता. हिराकोट किल्ल्याचे संग्रहालय करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रस्ताव दिला होता. मात्र ते शक्य झाले नसले तरी महाविकास आघाडी शासनाने आता पुढाकार घेतल्याने समाधान वाटत आहे.” – रघुजीराजे आंग्रे, कान्होजी आंग्रे वंशज

आपली प्रतिक्रिया द्या